जळगाव : एक भाऊ हयात असतांना देखील आपण एकटीच वारस असल्याचे दाखवत मालमत्ता बळकावण्यासाठी खोटे पुरावे सादर करणाऱ्या बहिणीविरुद्ध न्यायालयीन आदेशाने जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शकुंतला ऊर्फ रेखा पीतांबर फिरके (रा. न्हावी, ता. यावल) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.
कमलाकर भोळे यांना अरुण भोळे हे भाऊ तर मीराबाई प्रेमराज पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) व रेखा पितांबर फिरके या दोन बहिणी आहेत. यापैकी बहिण मीराबाई व भाऊ अरुण यांचे निधन झाले आहे. भोळे कुटुंबाची असोदा शिवारात शेत जमीन आहे. रेखा फिरके यांनी 3 जानेवारी 2022 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने या मालमत्तेला आपण एकटेच वारस असल्याचे दाखवून खोटे पुरावे न्यायालयापुढे सादर केले. त्यानंतर ही शेती परस्पर विक्री देखील केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर कमलाकर भोळे यांनी न्यायालयात धाव घेत आपली कैफियत मांडली. न्यायालयाच्या आदेशाने शकुंतला फिरके यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोउनि सर्जेराव क्षीरसागर करत आहेत.