एक हजाराच्या लाचेत अडकला अभियंता

धुळे : मंजूर घरकुलाचे मूल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करुन धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती अभियंत्यास एसीबी पथकाने ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई केली आहे. परेश प्रदिपराव शिंदे असे धुळे जिल्ह्याच्या साक्री येथील पंचायत समिती ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचे नाव आहे. साक्री पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेतील तक्रारदारास शबरी आवास योजने अंतर्गत सन 2023-24 मध्ये घरकुल मंजुर झाले आहे. मंजूर घरकुलाच्या झालेल्या बांधकामाचे फोटो काढून त्याची नजरी तपासणी करुन त्याचे मुल्यांकन साक्री पंचायत समिती कार्यालयात सादर करण्याचे काम बाकी होते. त्यानंतर या कामाचा धनादेश मिळणार होता. ही प्रक्रिया पार पाडून धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात अभियंता परेश शिंदे याने तक्रारदारास एक हजार रुपयांची लाच मागितली होती.  तक्रारदाराने एसीबी कार्यालयास याबाबत दुरध्वनीच्या माध्यमातून माहिती दिली. एसीबी पथकाने तक्रारदाराची भेट घेऊन पुढील पडताळणी आणि कारवाई केली. 

सुरत महामार्गावरील घोडदे गावाच्या सर्व्हिस रोडवरील बसस्थानकाजवळ अभियंत्याने कारमध्ये पंचासमक्ष तक्रारदाराकडून एक हजार रुपये लाच म्हणून स्विकारली. त्याच वेळी एसीबी पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here