रुपालीने सुपडूसंगे फुलवला प्रेमाचा गुलाबी मळा – गणेशची रक्तरंजीत हत्या झाली कापून त्याचा गळा   

जळगाव/छ. संभाजीनगर (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): समुद्राची खोली मोजता येते मात्र एखाद्या स्त्रीच्या मनाची खोली मोजणे कठीण असते असे म्हटले जाते. एखाद्या स्त्रीच्या मनात काय सुरु आहे? ती केव्हा काय करेल अथवा केव्हा कोणते रुप धारण करेल हे कुणालाही कळत नाही. शरीरसुखासह धनाची लालसा बाळगणारी स्त्री कुणाच्या मनाचा विचार करत नाही. तन आणि धन कायमस्वरुपी टिकणारे नसते, मात्र मन हे चिरकाल टिकणारे असते हे लालसी स्त्रीयांना कळत नाही. याचे कारण म्हणजे तारुण्याच्या नादात त्यांची बुद्धी भरकटलेली असते. तारुंण्याची मौजमस्ती आणि धनाची लालसा अशा स्त्रीयांना स्वस्थ बसू देत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात राहणा-या रुपाली दराखे या विवाहीतेने आपल्या प्रियकरासह त्याच्या साथीदारांच्या मदतीने तिच्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना उघडकीस आली. अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची रुपाली दराखे या विवाहीतेने चौघांच्या मदतीने कशा प्रकारे हत्या घडवून आणली ते बघूया.

गणेश जगन्नाथ दराखे आणि रुपाली दराखे हे दोघे पती पत्नी सिडको परिसरातील नवजीवन कॉलनीत रहात होते. मिस्त्री काम करुन गणेश हा त्याच्या संसाराचा गाडा ओढत होता. मिस्त्री कामातून त्याला हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते. वैवाहीक जीवनात पत्नी रुपालीपासून गणेशला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य झाले. चंचल स्वभाव आणि छानछोकीत राहण्याची सवय असलेल्या रुपालीचे पती  गणेशसोबत कालांतराने जमेनासे झाले. दोघांमधे काही ना काही कारणावरुन वाद होऊ लागले. त्यामुळे नात्याने पती पत्नी असले तरी दोघे विभक्त राहू लागले. बघता बघता जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला. पाच वर्षापासून रुपाली आणि गणेश विभक्त रहात होते. या विभक्तपणाच्या कालावधीत रुपालीचे सुपडू सोनू गायकवाड या तरुणासोबत सुत जुळले. रुपालीच्या मावसबहिणीचा दिर असलेला सुपडू हा जेसीबी चालक म्हणून काम करत होता. बत्तीस वर्षाच्या रुपालीचे पस्तीशीतील सुपडूसोबत बघता बघता प्रेमप्रकरण बहरु लागले. जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील कु-हाड या गावी राहणारा सुपडू देखील रुपालीच्या प्रेमात बहकला. दोघे एकमेकांना खुल्लमखुल्ला भेटू लागले.

पतीपासून विभक्त राहणा-या रुपालीला पती गणेशचा अजिबात धाक नव्हता. त्यामुळे ती मनसोक्तपणे सुपडूला भेटू शकत होती. दोघांमधील अनैतिक संबंध दिवसेंदिवस वाढत होते. काही महिन्यांपुर्वी रुपालीचा पती  गणेशने त्याच्या घराचा सौदा केला. त्यातून त्याला 21 लाख रुपये मिळणार होते. रुपाली आणि गणेश विभक्त रहात असले तरी ते कायद्याने विभक्त झालेले नव्हते. ते अजूनची पती पत्नी होते. घराच्या सौद्याच्या 21 लाख रुपयांपैकी दोघांच्या संयुक्त बॅंक खात्यात आठ लाख रुपये जमा झाले. या कालावधीत गणेशने रुपालीसोबत एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. घराच्या सौद्यातून मिळत असलेली रक्कम बघता तिने त्याच्या सोबत राहण्यास सहमती दर्शवली. मात्र तिचे सुपडूसोबत देखील अनैतिक संबंध सुरु होते. इकडे सुपडूसोबत सुरु असलेले अनैतिक संबंध आणि दुसरीकडे घराच्या सौद्याचे लाखो रुपये बघून तिने पती गणेशसोबत राहण्यास सहमती दिली. अशा प्रकारे दोन्ही तबल्यावर तिने मतलबी हात ठेवला होता.

रुपालीने पती गणेशसोबत राहण्यास सुरुवात केली खरी, मात्र काही दिवसातच तिला तो सुपडू आणि तिच्या अनैतिक संबधातील अडथळा वाटू लागला. त्यामुळे रुपालीने सुपडूच्या मदतीने गणेशच्या हत्येचा कट आखण्यास सुरुवात केली. पती गणेशच्या हत्येची दोन लाख रुपयांमधे सुपारी देण्याची तिने तयारी दर्शवली. ब्युटीपॉर्लर टाकण्याचा बहाणा करत तिने गणेशकडून दोन लाख रुपये घेतले. पतीकडूनच घेतलेल्या दोन लाख रुपयातून तिने त्याच्याच हत्येची सुपारी सुपडूला दिली. आपल्या पैशातून आपल्याच हत्येची सुपारी दिली जाणार असल्याचे गणेशला माहिती नव्हते. 

सुपडूने जेसीबी मशीनवर त्याच्यासोबत काम करणारा त्याचा मित्र अमोल चिंतामण चौधरी याला सोबत घेत गणेशच्या हत्येचे नियोजन केले. या कटात जेसीबी चालक अमोलने त्याचे मित्र अजय दिलीप हिवाळे आणि अनिकेत कडूबा चौथे यांना सोबत घेतले. अशा प्रकारे चौघे मजूर गणेशच्या हत्येसाठी एकत्र आले. अमोल, अजय आणि अनिकेत हे तिघे जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील रहिवासी होते.

ठरलेल्या कटानुसार अमोल, अजय आणि अनिकेत हे तिघे 17 एप्रिल रोजी संभाजीनगर येथे आले. त्यांनी गणेशची भेट घेतली. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. हा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी गणेशच्या मागावर राहण्याचे ठरवले. गणेश घरातून केव्हा निघतो? घरी परत केव्हा येतो? कुठे कुठे जातो? या त्याच्या हालचालींवर तिघांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या रोजच्या दिनचर्येचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर 4 मे रोजी गणेशची हत्या करण्याचे दुस-यांदा नियोजन करण्यात आले.

4 मे चा दिवस सुरु झाल्यानंतर मध्यरात्री एक वाजता अमोल, अजय आणि अनिकेत हे तिघेजण जामनेर येथून दुचाकीने ट्रीपलसीट छत्रपती संभाजीनगरला जाण्यास निघाले. सकाळी पाच वाजता तिघे संभाजीनगर येथे पोहोचले. हर्सुल टी पॉइंट याठिकाणी तिघांनी सोबत चहा घेतला. त्यानंतर रुपालीने दिलेल्या माहितीनुसार तिघेजण एसबीओए शाळेच्या मागे असलेल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसरात आले. त्यावेळी नेहमीप्रमाणे गणेश जेवणाचा डबा घेऊन कामावर जाण्यास निघाला. आज आपण कामावर जात नसून यमलोकात जात आहोत हे गणेशला ठाऊकच नव्हते. ते केवळ तिघा मारेक-यांना आणि नियतीला ठाऊक होते.

गणेश समोर दिसताच दबा धरुन बसलेल्या तिघांनी त्याला गाठले. भल्या पहाटे धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरण्यात आला. अचानक झालेल्या हल्ल्याने गणेश बिथरला. गळा कापला गेल्याने तो जीवाच्या आकांताने धावत मदतीची याचना करत होता. गणेश जबर जखमी झाल्याचे बघून तिघे मारेकरी घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले. जीव वाचवण्यासाठी गयावया करणारा गणेश नजीकच्या मॉर्निंग ट्रॅकवर जावून खाली कोसळला. त्यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या दोन महिलांनी जखमी गणेशला पाहीले. रक्ताच्या थारोळ्यात लगणेशला बघून त्या दोन महिलांनी भितीपोटी आरडाओरड करत तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती सिडको पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठले. जखमी गणेश हा पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता. त्याला वैद्यकीय उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली होती. दुपारी ब-याच वेळानंतर त्याची ओळख पटली. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घराचा माग काढत पोलिस पथक त्याच्या घरी आले. त्यावेळी त्याची पत्नी घरी नव्हती तर दोन्ही मुले घरी होती. त्याच्या पत्नीसोबत संपर्क साधून तिला सिडको पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले.

मयत गणेशची पत्नी रुपाली हिचे तिचा मावस बहिणीचा दिर सुपडू गायकवाड याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना खब-यांसह तिच्या बहिणीकडून समजली होती. त्यादृष्टीने रुपालीकडून अधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिस स्टेशनला बोलावण्यात आलेल्या रुपालीची कसून चौकशी करण्यात आली. तिची चौकशी  सुरु असतांना तिच्या डोळ्यात अश्रूचा एकही थेंब आला नाही. येथेच पोलिसांच्या शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे तिची अजून सखोल चौकशी करण्यात आली. माझ्या पतीला कुणी मारले मला काहीच माहिती नाही? तो मद्यपान करत होता. त्यामुळे त्याला कुणीतरी मारले असावे असे म्हणत तिने आपण त्या गावचेच नाही असे पोलिसांना दाखवण्यास सुरुवात केली. तुझ्या पतीला तु मारले नाही तर तुझ्या भावानेच मारले असेल, आम्ही त्याला पकडून आणतो असे म्हणत तिला तिच्या भावाच्या अटकेची भिती दाखवण्यात आली. आपल्या भावाचे विनाकारण नाव पुढे येत असल्याचे बघून ती मनातून घाबरली. माझा भाऊ कशाला माझ्या पतीला मारेल? त्याचा काहीही संबंध नाही असे म्हणत ती गयावया करु लागली.

तु मारले नाही, तुझ्या भावाने मारले नाही मग त्याला कुणी मारले ते खरे खरे सांग असा तिला दम देण्यात आला. तिच्याकडून सत्य परिस्थिती वदवण्यासाठी महिला पोलिसांची मदत घेण्यात आली. तिला महिला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ती सत्य कथन करु लागली. तिने आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सुरुवात केली. वासनेच्या आहारी गेलेल्या रुपालीचे सुपडू गायकवाड याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात रुपालीचा पती  गणेश याचा अडथळा येत होता. त्यामुळे त्याचा सुपडूच्या मदतीने काटा काढण्याचे रुपालीने ठरवले होते. याकामी सुपडूने त्याचे साथीदार अमोल, अजय आणि अनिकेत या तिघांची मदत घेतली होती.

खूनाची घटना घडल्यानंतर तिघे मारेकरी आपल्या गावी जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे पळून आले होते. रुपालीचा प्रियकर सुपडू हा पाचोरा तालुक्यातील कु-हाड येथे होता. तशी माहिती सिडको पोलिसांना तांत्रीक मदतीने समजली. त्यानुसार सिडको पोलिसांनी जळगाव जिल्ह्याच्या पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. सचिन सानप यांच्याशी संपर्क साधत मदत मागितली. पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. सचिन सानप यांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आपल्या सहका-यांच्या मदतीने पो.नि. सचिन सानप यांनी तिघांना पहुर कसबे येथून तर सुपडू गायकवाड यास पाचोरा तालुक्यातील कु-हाड येथून शिताफीने ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले. दरम्यान सिडको पोलिस स्टेशनचे पथक पहुर पोलिस स्टेशनला आले  होते. त्या पथकाच्या ताब्यात चौघांना सुरक्षीतरित्या देण्यात आले. याकामी पहुर पोलिस स्टेशनचे  प्रभारी सचिन सानप आणि त्यांचे सहकारी थकाचे या गुन्ह्याच्या तपासकामी सिंहाचा वाटा आहे. त्यांनी माहिती मिळताच चौघा संशयीतांना वेळीच ताब्यात घेत अटक केली. 

रुपाली गणेश दराखे (रा. नवजीवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), सुपडू सोनू गायकवाड (रा. कुऱ्हाड, ता. पाचोरा, जि. जळगाव), अमोल चिंतामण चौधरी, अजय दिलीप हिवाळे आणि अनिकेत कडूबा चौथे (तिघे रा. पहुर कसबे) असे एकुण पाच जण अटक करण्यात आले. यातील अनिकेत हा अट्टल गन्हेगार असून तो जळगाव पोलिस दलाच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध लुटमार आणि प्राणघातक हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप व त्यांचे सहकारी हे.कॉ. विलास चव्हाण, पोलिस नाईक ज्ञानेश्वर ढाकरे, पो.कॉ. गोपाळ गायकवाड यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here