चोरीच्या सात मोबाईलसह चोरट्यास अटक

जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात फिरण्यासह पोहण्यासाठी आलेल्या तरुण तरुणींच्या दुचाकीच्या डिक्कीतून मोबाईल चोरणा-यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अनिल रघुनाथ चव्हाण (रा. रोटवद तांडा ता. जामनेर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. रविवार दि. 12 मे रोजी ही घटना घडली होती. सुमारे 81 हजार रुपये किमतीचे एकूण सात मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

शिक्षणासाठी जळगावला मुक्कामी असलेले मित्र मैत्रीण 12 मे रोजी सुट्टी असल्यामुळे मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. मेहरुण तलावात पोहण्यास जाण्यापूर्वी या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. सुमारे एक तास पोहून आल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले सात मोबाईल वाहनांच्या डिक्कीतून चोरीला गेल्याचे समजले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मेहरुण तलाव परिसरात बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या वॉचमनने हा चोरीचा प्रकार केल्याची माहिती एमआयडीसीचे पोलीस कर्मचारी गणेश ठाकरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबनन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार सचिन मुंडे, किशोर पाटील, योगेश बारी, ललित नारखेडे, चंद्रकांत पाटील यांनी मोबाईल चोरटा अनिल रघुनाथ चव्हाण यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 81 हजार रुपये किमतीचे सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here