सायरन वाजताच लाखोंच्या मुद्देमालासह पळून गेले सहा लुटारु 

जळगाव : प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील तिघांना अटक केल्याची यशस्वी कामगिरी शनीपेठ  पोलिसांनी मध्यरात्री केली. त्यानंतर काही वेळातच सराफ बाजारातील ज्वेलर्स शॉपमधील सोन्या चांदीसह रोकडचा ऐवज सहा जणांनी लुटून नेल्याचा प्रकार मध्यरात्री उघडकीस आला. या घटनेने जळगावच्या सराफ बाजारात खळबळ माजली आहे. या घटनेतील लुटारुंच्या शोधासाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शनिपेठ पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे. 

जळगावच्या सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स या दुकानात 20 मे च्या पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास मोटरसायकलने सहा लुटारु आले. सुमारे 32 लाख रुपये किमतीचा 7 किलो चांदीचा समावेश असलेला 350 ग्रॅम मुद्देमाल आणि 30 हजाराची रोकड असा ऐवज त्यांनी लुटून नेला. दरम्यान दुकानातील सायरन वाजल्यामुळे लुटारु पळून गेले. सायरन वाजल्याने अन्य लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल बचावला आहे. या घटनेतील लुटारु विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी त्यांच्या मोटरसायकलचे क्रमांक स्पष्ट झालेले नाहीत.

या घटने प्रकरणी दुकान मालक सौरभ कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिपेठ पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत. समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांचे सहकारी देखील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here