जळगाव : दोघा अल्पवयीन चुलत बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने विस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राज संतोष कोळी (19) रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. न्या. एस. एन. राजुरकर यांच्या न्यायालयाने त्याला विस वर्षाच्या सश्रम कारावासासह पंधरा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
घटनेच्या दिवशी 20 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी राज संतोष कोळी याने अनुक्रमे सहा व सात वर्षाच्या दोघा चुलत बहिणींना आपल्या घरी बोलावून घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकाराची वाच्यता दोघा बहिणींनी त्यांच्या आईकडे केली. या घटनेप्रकरणी राज कोळी याच्याविरुद्ध कलम 376 ए-बी तसेच पोक्सो कलम 4, 6, 8 व 10 नुसार नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 चे कलम 6 नुसार आरोपी राज कोळी यास विस वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 चे कलम 10 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास अशा स्वरुपाची त्याला शिक्षा सुनावली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण केला. या गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दोघा पिडीत बालिकांनी या घटनेची हकीकत न्यायालयाला जशीच्या तशी कथन केली. त्यामुळे दोघा पिडीतांची साक्ष महत्वाची ठरली. विशेष सरकारी वकील तथा अतिरिक्त शासकीय अभियोक्ता चारुलता बोरसे यांनी युक्तिवाद करत सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदारांची उलट तपासणी केली. पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सरकार पक्षाला योग्य ते सहकार्य केले.