अटकेतील आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी जमावाचा पोलिसांवर हल्ला

जळगाव : सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार व त्यानंतर तिची हत्या करुन फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या नराधमास अटक केल्याची माहिती समजताच शोकसंतप्त आदिवासी बांधव चिडले. अटकेतील आरोपीस आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा फैसला करु असे म्हणत त्यांनी थेट जामनेर पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे जखमी झाले असून त्यांच्यासह इतर जखमी पोलिस कर्मचा-यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

सुभाष उमाजी भिल असे अटकेतील नराधम आरोपीचे नाव आहे. या नराधमाने जामनेर तालुक्यातील सहा  वर्षाच्या एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केला होता. केवळ अत्याचारावरच न थांबता त्याने तिची हत्या देखील केली. व त्यानंतर तो फरार झाला होता. 11 जूनच्या सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जामनेर तालुक्यात खळबळ माजली होती. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले होते. या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट कसा असा आरोप केला जात होता. मात्र जामनेर पोलिसांचे पथक  त्याच्या मागावर होते. अखेर त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने भुसावळ येथून अटक करण्यात यश आले.

सुभाष भिल यास भुसावळ येथे गुरुवारी सायंकळी ताब्यात घेतल्याची माहिती समजल्यानंतर चिडलेले आदिवासी बांधव भुसावळ येथे एकत्र आले. त्यांनी ‘इसका फैसला हम करेंगे अशी अशी भूमिका घेत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सुरु केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांचा फौजफाटा आणि भुसावळ नगरपालिकेचे अग्निशमन बंब जामनेरला रात्रीच सुरक्षेच्या दृष्टीने गुरुवारी रात्री उशिरा रवाना करण्यात आले. परिस्थितीवर कसेबसे नियंत्रण मिळवल्यानंतर आरोपीला जामनेर येथे आणले गेले. मात्र त्यांनी थेट जामनेर पोलिस स्टेशनवर हल्लाबोल करत कायदा हातात घेण्यास सुरुवात केली.  

या हल्ल्याने जामनेर पोलिस स्टेशन परिसरातील वातावरण बिघडले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या काही जणांना रात्रीच ताब्यात घेतले. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह जवळपास दहा पोलिसकर्मी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्यासह अश्रुधुराच्या नळ्या फोडण्याची तसेच छर्रे असलेल्या बंदुकीतून ब-याचा फायरिंग करण्याची वेळ आली. या हल्ल्याच्या घटनेत पोलिस स्टेशनच्या काचा फुटल्या तसेच काही वाहनांचे नुकसान झाले. जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील या जखमी पोलिस कर्मचा-यांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here