भाजपची घसरलेली ब्रँड व्हॅल्यू आणि विश्वासाहर्ता

देशात आणि महाराष्ट्रात आता विविध राजकीय पक्षांचे ब्रँड्स आणि ब्रँड व्हॅल्यू यांची उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. मुख्य मुद्दा भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटली, कमी झाली, घसरली हा आहे. आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मध्ये अलीकडेच प्रकाशित रतन शारदा नामक लेखकाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करताना राज्याच्या सत्तेत महायुतीत भाजपा – शिंदे शिवसेनेसोबत अजितदादा पवार यांचा राकॉ घटक पक्षही अनावश्यकरित्या सत्तेत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचे नवे नॅरेटिव्ह मांडून एक प्रकारे दादा गटाला  सत्तेबाहेर काढण्याची सूचना केली.

भाजप पराभवाचे खापर दादा गटाच्या माथ्यावर फोडून राज्याचे भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बचावार्थ संघ मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे. देशात चारशे पार, महाराष्ट्रात 45 पार अशी गर्जना करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रात डबल डिजिट (दोन अंकी) आकडा गाठता न आल्याने हा पराजय केंद्रीय नेत्यांच्या जिव्हारी लागला. तो आरएसएसच्याही जिव्हारी लागला. पण निवडणुकीच्या अंतिम चरणात आम्हाला आता आरएसएसचीही गरज नाही इतके आम्ही सशक्त बनल्याचे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मुखातून वदवून घेण्यात भाजपचे दिल्लीचे नेते मोदी – शहा यशस्वी झाले. त्याला उत्तर म्हणून संघाच्या मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या कुटुंबातील सदस्यांच्या काठीने पक्षाच्या कथित ब्रँडला तडाखा देत राज्याच्या आघाडीचा संघ सैनिकांचा बचाव करण्याचा प्रयत्न झाला हे चाणाक्ष वाचक, विश्लेषकांच्या नजरेतून सुटले नाही.

आता पंढरीच्या वारीचा आवाज घुमतोय. बरोबर एक वर्षांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळात फडणवीस यांच्या दिग्दर्शनाखाली अचानक आषाढी एकादशीच्या पावनक्षणी अजितदादा गटाच्या नऊ मंत्र्यांचा महायुतीत प्रवेशासह शपथविधी झाला होता. अर्थात भाजप शिंदे सेनेत आधीच एक उपमुख्यमंत्री असताना अजून एका उपमुख्यमंत्र्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हवाली करत त्यास पदावर विराजमान करण्यात आले. पंतप्रधान पदावर तेव्हा विराजमान असलेले नरेंद्र मोदीजी यांनी मध्यप्रदेशातल्या सभेत महाराष्ट्रातल्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात अजित दादांवर प्रत्यक्ष ठपका ठेवत प्रहार केला होता. तेव्हा हा भाजप नेतृत्वाचा पक्षाचा निर्णय म्हणून आरएसएस सह सर्वांनी स्वीकारला होता. त्याक्षणी मौनात गेलेले साधन शुचिता तत्ववादाची जपमाळ ओढणारे संस्कृती रक्षक, संवर्धक पडद्याआड राहून बघ्याच्या भूमिकेत वावरले हे जनतेने पाहिले. 

आता ब्रँड आणि ब्रँड व्हॅल्यू बघूया. देशाच्या विसाव्या शतकाच्या राजकारण, समाजकारणात स्वातंत्र्यासाठी लढण्याची विचारधारा हाच ब्रँड होता. या विचारधारेने प्रेरित होऊन लढलेला प्रत्येक स्वातंत्र्यसैनिक बलिदानाची किंमत मोजून सामील झाला होता. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरु, समाज सुधारक आगरकर असे अनेक स्वातंत्र्याच्या उर्मीतून लढले. तेव्हा कोणी ब्रँड आणि ब्रँड व्हॅल्यूची तमा बाळगली नाही.

अलीकडच्या राजकारणात काँग्रेस राजवटीला विरोध करणारे म्हणून कम्युनिस्ट, समाजवादी, जनसंघ, जनता पक्ष, जनता दल, लोकदल अशी भिन्न विचारधारा घेऊन अनेक नेते राजकीय मैदानात उतरले. अगदी अलीकडे म्हणजे 1970 च्या दशकात शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने हा पक्ष राज्याच्या सत्तेतही आला. त्याच्या साथीला भाजपही होताच. तेव्हाही ब्रँडची चर्चा नव्हती. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक ही एकच शक्ती राज्याने पाहिली. मात्र सन 2014 नंतर देशात देशाच्या राजकीय पटलावर अवतरलेले नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आजतागायत मोदी ब्रँड म्हणून गाजले. ताज्या लोकसभा निवडणुकीतही उमेदवाराकडे लक्ष न देता केवळ मोदीजी यांच्या प्रतिमेकडे बघूनच मते द्या असे म्हणत मोदी ब्रँड कॅश करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अलीकडे अजितदादांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांनाच उपमुख्यमंत्री पद बहाल करण्यात ब्रँडच संपला. त्यामुळे ब्रँडच उरला नसल्याने ब्रँड व्हॅल्यू चा प्रश्नच येत नाही. राजकारणात विश्वासार्हता कधीच संपली. त्यामुळे एखाद्या नेत्याने दर्शवलेला ब्रँड आणि त्याची किंमत केव्हाच संपली आहे. उरली ती स्वार्थाची वळवळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here