सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध दहा कोटींच्या खंडणीचा गुन्हा

मुंबई : न्यायालयीन कोठडी दरम्यान सुनावणी कालावधीत विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिप्पणी करत दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. कदम यांच्या तक्रारीनुसार कुलाबा पोलिसांनी चव्हाण यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे. 

माजी आमदार रमेश नागनाथ कदम यांच्या तक्रारीनुसार सन 2014 ते 2019 या कालावधीत दहिसर पोलिस स्टेशनला फसवणुकीसह लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात कदम यांना अटक झाली होती. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. 

पोलिस बंदोबस्तात न्यायालयीन सुनावणीसाठी सत्र न्यायालयात त्यांना आणले जात असताना 21 जानेवारी 2016 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालय प्रवेशद्वारातच चव्हाण यांनी कदम यांच्याकडे रागाने बघून जातीवाचक विधान केल्याचा आरोप आहे. याशिवाय ‘तू जे पैसे खाल्लेत त्यातील दहा करोड रुपये मला दे, पैसे दिले नाहीत तर तू जेलमधून कधीही सुटणार नाही. अनेक वर्ष जेलमध्येच रहावे लागेल’, असे म्हणत आपणास धमकावल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

या घटनेच्या वेळी गुन्ह्याच्या तपास अधिकारी हजर असल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयीन कोठडीत असल्याने चव्हाणविरुद्ध तक्रार केल्यास आपणास न्याय मिळण्याची आशा नसल्यामुळे त्यावेळी आपण तक्रार केली नाही असे कदम यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here