जळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पंधरा वर्षाच्या मुलाच्या खूनप्रकरणी महिलेचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी (रा. विखरण, ता. एरंडोल) याला जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पुराव्याअभावी मुलाच्या आईची निर्दोष मुक्तता केली आहे.
मयत मुलाची आई व प्रमोद शिंपी यांच्यातील प्रेम संबंधाची कुणकुण तिच्या मुलाला लागली होती. त्याने त्याच्या आईला हा प्रकार चुकीचा असून बंद करण्यास सांगितले होते. मात्र दोघांनी मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उलट त्यालाच कायमचे संपवण्याचा कट रचला होता. दोघांचे ठरल्यानुसार 16 जानेवारी 2022 रोजी रावेर येथे कबुतराचा पिंजरा घ्यायला जाण्याचा बहाणा करुन त्याला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या आसिरगड येथील जंगलात नेले. तेथे त्याला गळफास देऊन ठार मारण्यात आले.
दुसऱ्या दिवशी मुलाच्या वडिलांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला तो हरवल्याची तक्रार दिली होती. संशयाची सुई आणि तपास प्रमोद शिंपीपर्यंत गेला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याच्यासह मयत मुलाच्या आईला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून प्रमोद शिंपी हा न्यायालयीन कोठडीत तर महिला जामिनावर होती.
न्या. एस.एन. राजूरकर यांच्या न्यायालयात सुरु असलेल्या या खटल्यादरम्यान एकूण 17 साक्षीदारांची तपासणी झाली. यात प्रमोद शिंपी याचा मित्र, तपासाधिकारी, जळगावचे कोतवाल, मोबाइल सीडीआरविषयी तांत्रिक माहिती देणारे व इतरांची साक्ष महत्त्वाची ठरली. उपलब्ध पुरावे आणि साक्ष या आधारे न्यायालयाने प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पुराव्याअभावी मयत मुलाच्या आईची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. ते पुरावे ग्राह्य धरून न्या. एस.एन. राजूरकर यांनी प्रमोद शिंपी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सरकारी वकील अँड. प्रदीप महाजन यांचा युक्तिवाद प्रभावी ठरला. पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी काम पाहिले तर पोहेकॉ वासुदेव मराठे यांनी त्यांना सहकार्य केले.