छेडखानी शिगेवर, निलिमाचा निर्णय टोकावर! — त्रस्त विवाहिताने जीवनयात्रा संपवली फासावर

जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क) : तरुणाच्या छेडखानीला वैतागून यावल तालुक्याच्या किनगाव येथील विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना 28 नोव्हेंबरच्या सुरुवातीला रात्री एक वाजता घडली. या घटनेमुळे विवाहितेचा पती पत्नीप्रेमाला तर दोन मुले व एक मुलगी अशी तीन बालके मातृप्रेमाला पारखी झाली आहेत. रुपेश राजेंद्र धनगर या संशयित तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किनगाव बु. ता. यावल येथे निलिमा संजय कोळी ही विवाहिता पती व तीन मुलांसह रहात होती. निलिमा आणि संजय कोळी यांच्या घरासमोर रुपेश राजेंद्र धनगर या तरुणाचा गुरे बांधण्याचा गोठा आहे. गुरांची देखभाल करण्याच्या निमित्ताने त्याचे गोठ्याकडे नेहमी येणे जाणे होते. रात्री बे रात्री तो गोठ्यातच झोपण्यासाठी येत असे. गेल्या पाच-सहा महिन्यापासून गोठ्यात येण्याच्या निमित्ताने संजय कोळी आणि नीलिमा कोळी यांच्या घराकडे रुपेश याचे येणे जाणे सुरु होते. रुपेश आपल्याकडे वाईट नजरेने बघतो अशी नीलिमाची तिच्या पतीसह सासुकडे तक्रार रहात होती. तो नेहमी आपल्या घराकडे घिरट्या घालत असल्यामुळे त्याला संजय कोळी यांनी जाब विचारला होता. त्यावरुन रुपेश आणि नीलिमाचा पती संजय यांच्यात शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारी देखील झाली होती. काही नातेवाईकांनी मध्यस्ती करत त्यांची हाणामारी सोडवली होती. घराची इभ्रत लक्षात घेत नीलिमाचा पती संजय कोळी यांनी पोलीस स्टेशनला रुपेश विरुद्ध त्यावेळी तक्रार दिली नव्हती. त्यानंतर दोघांचा वाद तात्पुरता मिटला आणि रुपेशने गोठ्याकडे येण्याचा प्रकार बंद केला होता.

 गेल्या काही महिन्यापासून संशयित रुपेश धनगर पुन्हा नीलिमा आणि संजय यांच्या घराकडे फिरु लागला. तो अपरात्री गोठ्यातच थांबून झोपत होता. त्याच्या वाईट नजरेला नीलिमा वैतागली होती. त्यामुळे घराची इभ्रत लक्षात घेत पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध तक्रार करायची अथवा नाही हे नीलिमा आणि संजय कोळी यांना समजत नव्हते.

27 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी संजय कोळी हे काम आटोपून आपल्या घरी आले असता त्यांना पत्नी सौ. नीलिमा घाबरलेल्या अवस्थेत दिसली. तिने घरात स्वयंपाक देखील केलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी तिला काय झाले याबाबत विचारणा केली असता तिने पुन्हा रुपेश धनगर याची तक्रार पती संजय यांच्याकडे केली. रुपेश आज बराच वेळ गोठ्यात बसून होता आणि आपल्या घरासमोरुन वेळोवेळी चकरा मारून आपल्याकडे वाईट नजरेने बघत असल्याची तक्रार निलीमाने पती संजय यांच्याकडे केली. तिची भयभीत अवस्था बघून पती संजय अस्वस्थ झाला.

28 सप्टेंबर 2024 च्या सुरुवातीला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घरातील किचनमध्ये काहीतरी पडल्याचा मोठा आवाज संजय कोळी यांना आला. त्या आवाजाच्या दिशेने संजय आणि त्यांची आई झोपेतून उठून धावत गेले असता त्या ठिकाणी स्वयंपाक खोलीत नीलिमा हिने घराच्या छताला असलेल्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. जीव गुदमरल्यामुळे ती पाय झटकत होती.

घाबरलेल्या अवस्थेत संजयच्या आईने निलिमाचे पाय धरून ठेवले आणि संजय कोळी यांनी किचन ओट्यावर चढून नीलिमा हिने गळफास घेतलेल्या दोरीला कापले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी जवळच्या नातेवाईकांना तातडीने बोलावून नीलिमा हिस मालवाहू गाडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. गळफासाने निलिमा हिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल डॉक्टरांकडून पोलिसांना मिळाला. दरम्यानच्या कालावधीत नीलिमा हिने मृत्यूपूर्वी तिच्या हस्ताक्षरात लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली. 

“मी निलीमा कोळी वैतागून आत्महत्या करत आहे त्याचे कारण असे कि, एक मुलगा मला धमक्या देत असे. माझ्या सोबत प्रेम कर नाहीतर तुझ्या नव-याला आणि मुलांना जीवे ठार मारणार. रोजच्या धमक्यांना कंटाळत मी मरण घेते यात माझ्या घरच्या आणि परीवाराचा काही दोष नाही याचा दोषी फक्त रुपेश धनगर आहे”. असा मजकूर नीलिमाने त्या चिठ्ठीत लिहून ठेवलेला होता. याप्रकरणी मयत सौ. नीलिमा हिचा पती संजय कोळी यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार रुपेश धनगर या संशयिताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here