जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास भुसावळ न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गौतम शिवचरण चव्हाण असे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. या अत्याचार प्रकरणी 29 मे 2015 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सुरुवातीला या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र नंतर अधिकची माहिती व तपासानुसार याप्रकरणी अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले होते.
या खटल्यात सरकारपक्षाच्या वतीने पीडित मुलगी, तिची आई तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा, जन्म नोंदणी अधिकारी, तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक अशिष पी. शेळके आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या गुन्ह्यातील इतर आरोपींना निर्दोषमुक्त करण्यात आले आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विजय खडसे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक रफिक शेख कालू यांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला. पोलिस उपनिरीक्षक अशिष शेळके यांनी तपास पुर्ण केला.