मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरु होत असलेले पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना पार पडणार आहे. असे राज्याच्या इतीहासात प्रथमच घडत आहे.अधिवेशन काळात एक किंवा दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत असे कदाचित घडले असेल. मात्र संपूर्ण अधिवेशन काळात अध्यक्षच आले नसल्याचे कधी घडलेले नाही. मात्र आता तसे घडणार आहे. अधिवेशनासाठी हजर राहणा-या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य पुरवले जाणार आहे. अधिवेशन कालावधीत दोन्ही दिवस प्रत्येकाने हॅन्डग्लोज, मास्क लावून वावरले पाहिजे.
कोरोना विषाणूमुळे एकत्र येण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम देखील होणार नाही. अध्यक्षांच्या गैर हजेरीत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी म्ह्टले आहे. प्रत्येक आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी झाल्याशिवाय त्यांना आत प्रवेश मिळणार नाही. सर्व सदस्यांची आसन व्यवस्था देखील बदलण्यात आली आहे. एका सदस्यानंतर दोन सदस्यांची जागा सोडण्यात येणार आहे. काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत बसवले जाणार आहे.
प्रथम दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तसेच काही सदस्यांच्या निधनाचे शोकप्रस्ताव चर्चेला येतील. त्यानंतर सरकारच्यावतीने काही विधेयके सादर केली जातील. दुस-या दिवशी विधेयके व पुरवणी मागण्यावर चर्चा होणार आहे. दोन दिवसाच्या कालावधीचे हे अधिवेशन राहील. अधिवेशनात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी होणार नाही.