जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात

जळगाव दि.२३ प्रतिनिधी – शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत नाही. शेतकरी आणि शिक्षक ह्यांना नेहमी गुरूस्थानी मानले पाहिजे. कारण दोघांमुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन होत असते. प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये, विद्यालयांमध्ये शेती हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवला पाहिजे. विद्यार्थ्यांवर स्वत: शेतकरी होण्याची किंवा जे भोजन बळीराजामुळे मिळत आहे त्यामुळे त्यांचा आदर करण्याचा संस्कार आपोआप होईल. शेतकऱ्यांकडे असलेल्या ज्ञान समजून घेतले पाहिजे, सर्वात पारदर्शक व्यवहार म्हणजे शेतकऱ्यांचा आहे असे मनोगत सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर १४ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू असलेल्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषीमहोत्सवात शेतकऱ्यांशी सोनम वांगचुक यांनी संवाद साधला. २३ डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन शेतकऱ्यांचा सन्मान करुन  साजरा करण्यात आला. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांचे औक्षण आणि गांधी टोपी, तर महिला शेतकऱ्यांना रूमाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोनम वांगचुंक यांच्या समवेत जैन परिवारातील अभंग जैन, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बि. के. यादव, एस. एन. पाटील, संजय सोन्नजे, अनिल जोशी, दीपक चांदोरकर, गिरीष कुळकर्णी यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

शेतकरी दिनानिमित्त मार्गदर्शन करताना सोनम वांगचुक पुढे म्हणाले की, जैन इरिगेशन ही शेतकऱ्यांसाठी प्रभावी काम करणारी संस्था असून त्यांच्याशी जुळल्यानंतर लडाखमध्ये भेडसवणारा पाण्याचा प्रश्न आईस स्तुफा यातून दूर झाला. यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी हा विषय येण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कारण भोजन कसे तयार होते, त्यासाठी काय परिश्रम घेतले जाते, याची जाणिव निर्माण व्हावी. गणित, बायोलॉजी, मायक्रो बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, विज्ञान यासारखे विषय शेतीसाठी पूरक आहेत त्याचे ज्ञान घ्यायला हवे. शेती हा विषय महत्त्वाचा असल्याने विद्यालयात शेती केली जावी, प्रत्येक विद्यार्थी हा शेतकरी व्हावा. असे माझे स्वप्न आहे. 

लडाख मध्ये फळ, फुलांच्या वाढीसाठी जैन इरिगेशन सोबत काम करत आहे. सफरचंदासह अन्य फळबागांवर संशोधनात्मक कार्य केले जात आहे जेणे करून शेतकऱ्यांचा फायदा होईल. जगातील सर्वात गोड खुबानी लडाखमध्ये उत्पादित केली जाते त्यावरही जैन तंत्रज्ञानातून काही करता येईल का? यासाठी चर्चा सुरू आहे. कमी पाण्यात कमी खतांमध्ये उत्पन्न दूप्पट करण्याचा प्रयत्न जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनात दिसतो. या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी येऊन माहिती घ्यावी असे आवाहनही सोनम वांगचुक यांनी केले.डॉ. बी. के. यादव यांनी जैन इरिगेशन आणि सोनम वांगचुक यांच्यासोबत आईस स्तूफा ह्या संकल्पनेविषयी सांगितले. प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक चांदोरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here