मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अधिवेशन सुरु होण्यापुर्वीच सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. मात्र अनेकांना तपासणी अहवालांसाठी ताटकळत थांबावे लागले. आमदारांसह कर्मचाऱ्यांनादेखील अहवाल वेळेत मिळत नव्हता. या सगळ्या कारभाराचा मोठा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या एका अधिकाऱ्याचा काल विधिमंडळात मुक्त संचार असल्याची माहिती समोर येत आहे.
काल सकाळी आमदार, विधिमंडळाचे अधिकारी विधिमंडळ परिसरात हजर झाले. अहवालाची सर्व जण प्रतिक्षा करत होते. या गडबडीत डिस्टन्स कुणी पाळत नसल्याचे दिसून आले. दरम्यान आमदारांना विधीमंडळात पोहोचता आले नाही. विधीमंडळात प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पासवर फुली मारल्यानंतर आत जाण्याची परवानगी होती. हे लक्षात आल्यावर संसदीय कामकाज कक्षातील कामकाज करणा-या एका अधिका-याने स्वत:च्या ओळखपत्रावर फुली मारुन घेतल्याने त्याला विधिमंडळात प्रवेश केला.
महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचा दुपारी १२ ते ३ या दरम्यान विधिमंडळात मुक्त संचार सुरु होता. या तीन तासांच्या कालावधीत तो अधिकारी अनेक विभागात गेला. त्या अधिका-यास कोरोना झाला असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे त्या अधिका-यास तात्काळ रुग्णालयात रवाना करण्यात आले. हा अधिकारी ज्यांच्या संपर्कात आला आहे त्यांची चिंता वाढली आहे.