घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडयानिमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे, जिल्हा सरकारी अधिवक्ता ॲड. निती दवे, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन आदीं उपस्थित होते.
या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषकांच्या मानसिकतेतच बदल होण्याची आवश्यकता आहे. न्यायालयीन कामकाजात संबंधित न्यायाधीश व अधिवक्त्यांनी मराठीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले. विवेकानंद विद्यालयातील शिक्षक विवेक कवठेकर म्हणाले की, हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या मराठीचे गोडवे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासुन स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, सुरेश भटांपर्यत सर्वांनी गायले आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांनी म्हटले की, न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर करणे आवश्यक असल्याचे म्हटले.
या वेळी न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित लउळकर, सह दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते, न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रृती शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रेणुका इंगळे – पतंगे, सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी रेणुका मोरे आदींनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास ठाकरे यांनी तर संचालन सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी रेणुका मोरे यांनी केले. आभार प्रभारी प्रबंधक संजय बखाल यांनी मानले.