अल्पवयीन मुलीचा विनयभंग – आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावास

घाटंजी (यवतमाळ) : मारेगांव येथील आरोपी राहुल बंडु नंदुरकर (रा. मारेगांव) यांस अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पांढरकवडा येथील न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व ₹ १५०० दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ३ महीन्याची अतिरिक्त शिक्षा आरोपीस भोगावी लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उप निरीक्षक दिपक गावंडे यांनी सहकार्य केले. आरोपीची बाजू ॲड. पी. एम. पठाण यांनी मांडली. 

न्यायालयातील निवाड्यानुसार, अल्पवयीन पिडीता ही २ जुलै २०१८ रोजी दुपारी घरी झोपून असतांना आरोपी राहुल बंडु नंदुरकर (रा. मारेगांव) हा वाईट उददे्शाने घरात घुसून पिडीतेचा विनयभंग केला. पिडीतेच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी बंडु नंदुरकर विरुद्ध मारेगांव पोलीस ठाण्यात अपराध क्रंमाक १८१/२०१८ भादंवि कलम ३५४, ३५४ अ व ४५२, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक २०१२ चे कलम ८ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३ (१) (w) (१) २ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी करून पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण ७ साक्षीदार तपासले. आरोपी बंडु नंदुरकर यांस भादंवि कलम ४५२ अंतर्गत २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, भादंवि कलम ३५४ अंतर्गत २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन्ही गुन्हयात ₹ १००० दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी २ महीन्याची अतिरिक्त शिक्षा तसेच पोक्सो कलमांतर्गत ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व १५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी ३ महीन्याची अतिरिक्त शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. दंडातील रक्कम रुपये ३००० पिडीतेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेंमत सातभाई यांनी दिले आहे. आरोपीला सर्व शिक्षा एकत्र भोगावी लागणार आहे. शासनाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here