यवतमाळ (घाटंजी) : रुंझा ता. केळापूर येथील बहुचर्चित बलात्कार व पोक्सो प्रकरणातील आरोपी शेख सत्तार शेख मियां (वय ६०) यांची न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीची बाजू यवतमाळचे ज्येष्ठ वकील ॲड. एस. एम. अली यांनी मांडली.
रुंझा येथे दिनांक २५ एप्रिल २०१८ रोजी शेख सत्तार शेख मिया (वय ६० वर्षे) यांनी एका ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्या बाबतची तक्रार पिडीतेच्या आई – वडिलांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली होती. सदर तक्रारीवरुन आरोपी शेख सत्तार शेख मियां विरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (१), ३७६ (२) (n), ३७७, ५०४, ५०६ पोक्सो कलम ४, ६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास करून पांढरकवडा पोलिसांनी केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे डॉक्टर, तपास अधिकारी, पीडिता, पीडितेचे आई – वडील व इतर असे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी शेख सत्तार शेख मियां यांची बाजू यवतमाळचे ज्येष्ठ वकील ॲड. एस. एम. अली यांनी न्यायालयात मांडली. शासन व आरोपी यांच्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी आरोपी शेख सत्तार शेख मियां यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
आरोपी शेख सत्तार शेख मियां यांचेतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. एस. एम. अली (यवतमाळ) यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. राहुल पाटील, ॲड. मनीष भगत, ॲड. एस. टी. अली, ॲड. वजाहत अली आदींनी सहकार्य केले.