जळगाव : किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने अकरा वर्षाच्या बालिकेस घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुभाष हरचंद महाजन (५५), वाडे, ता.भडगाव यास जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आज रोजी दोषी ठरवले. १४ सप्टेंबर रोजी या शिक्षेची सुनावणी होणार आहे. न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात या खटल्याचे न्यायालयीन कामकाज सुरु आहे.
१८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुभाष हरचंद महाजन याने पीडित बालिकेस किराणा दुकानावर जाण्याच्या निमीत्ताने घरात जवळ बोलावले होते. त्यानंतर त्याने दरवाजा बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या घटने प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी भडगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भा.द.वि. कलम ३७६ (२)(आय)(एच) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी केला. सरकार पक्षाच्या वतीने ९ साक्षीदार तपासण्यात आले होते. यात पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. सरकारतर्फे अॅड.चारुलता बोरसे यांनी युक्तीवाद केला.
न्यायालयासमोर आलेले पुरावे तसेच अॅड.बोरसे यांचा युक्तीवाद लक्षात घेता बुधवारी न्यायालयाने आरोपी सुभाष महाजन यास दोषी ठरवले. १४ सप्टेबर रोजी शिक्षेची सुनावणी होणार आहे. आरोपीतर्फे अॅड.मुकेश शिंपी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.