जळगाव : वैद्यकीय सेवेत कसुर व चुकीचा उपचार केल्याच्या आरोपाखाली जळगाव येथील डॉ. राजेंद्र सरोदे व डॉ. वैशाली सरोदे या दाम्पत्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने साडे तीन लाख रुपये भरपाई व एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. या निकालाविरुद्ध आपण अपील करणार आहोत असे डॉ. सरोदे यांनी म्हटले आहे.

जळगाव शहरातील रिंग रोड येथील डॉ. सरोदे दाम्पत्याकडे जामनेर येथील सोनाबाई नारायणराव रोजतकर या 85 वर्ष वयाच्या वयोवृद्ध महिला पायावरील त्वचारोगाच्या उपचारासाठी सन 2021 मधे आल्या होत्या. चुकीच्या जागी उपचार करुन घेतलेल्या रकमेचे बिल दिले नाही असा डॉ. सरोदे दाम्पत्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज नंतर रुग्ण सोनाबाई यांच्या मुलाने त्यांचा दुसरीकडे इलाज केला व त्यामुळे अधिकचा खर्च झाला असा देखील डॉ. सरोदे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नारायण रोजतकर यांनी 26 ऑगस्ट 2022 रोजी जळगाव ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला. या अर्जावर सुनावणी होऊन आयोगाने डॉ. सरोदे दाम्पत्यास नुकसान भरपाईपोटी साडेतीन लाख रुपये व एक लाख रुपये दंडाचे आदेश दिले. आयोगाचे सदस्य एस. ए. माणिक यांनी हे आदेश दिले आहेत. रोजतकर यांच्यातर्फे अॅड. एस. के. कौल यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
दरम्यान आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी आपल्याविरुद्ध न्यायालयात नोकरी करणा-या रुग्ण महिलेच्या मुलाने तक्रार केल्याचे डॉ. राजेंद्र सरोदे यांनी क्राईम दुनिया सोबत बोलतांना म्हटले आहे. याबाबत सविस्तर बोलतांना त्यांनी म्हटले की 85 वर्ष वयाच्या वयोवृद्ध रुग्ण महिलेच्या पायाला सेप्टीक झाले होते. सन 2021 मधे रुग्ण महिला आपल्या रुग्णालयात त्वचारोग तज्ञ डॉ. वैशाली सरोदे यांच्याकडे उपचारासाठी आल्या होत्या. त्यांचा पाय सडण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे त्यांच्या पायाला भुल देऊन चिरा मारुन पायातील सेप्टीक काढण्यात आले होते. पाच दिवस रुग्ण महिला दवाखान्यात अॅडमीट होत्या. त्यानंतर जखम आटोक्यात आली.
जखम आटोक्यात आल्यानंतर ड्रेसींग करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आपणास वेळोवेळी ड्रेसिंग करण्यासाठी यावे लागेल असे रुग्ण महिलेस डॉ. सरोदे यांनी सांगितले होते. मात्र रुग्ण महिला सोनाबाई या डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा डॉ. सरोदे यांच्या दवाखान्यात आल्याच नाही. त्यांनी जामनेर येथे स्थानिक दवाखान्यात वेळोवेळी ड्रेसींग करुन घेतले. त्यानंतर जखमा दुरुस्त झाल्या.
त्यानंतर एक वर्षानंतर वयोवृद्ध रुग्ण महिलेमार्फत आपणास कायदेशीर नोटीस मिळाली. रुग्णाचे वय 85 असल्यामुळे प्रतिकार शक्तीची कमतरता लक्षात घेत संभाव्य धोक्याची आपण रुग्णाला कल्पना दिली होती असे डॉ. सरोदे यांनी म्हटले आहे. त्यातूनही रुग्ण महिला बरी झाली. रूग्ण महिलेचा मुलगा न्यायालयात नोकरीला असल्यामुळे केवळ पैसे उकळण्यासाठीच न्यायालयात आपणास ओढण्यात आल्याचे डॉ. सरोदे यांनी म्हटले आहे. त्यात कोणतेही एक्सपर्ट ओपिनियन घेतले गेले नाही असे देखील डॉ. सरोदे यांनी क्राईम दुनिया सोबत बोलतांना म्हटले आहे. आपण या निकालाविरुद्ध अपील करणार आहोत आणि वेळीच उपचार करुन रुग्ण बरा झाल्यानंतर देखील तक्रार दाखल करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्ताने डॉ. सरोदे यांनी केला आहे.