यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) – राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे यवतमाळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एन. व्ही. न्हावकर व सचिव के.ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मार्च रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय घाटंजी येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’ आयोजीत करण्यात आली होती. लोक अदालतीची सुरुवात जेष्ठ व महिला पक्षकार मंडळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व रोपांना पाणी देवून करण्यात आली.
यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, घाटंजी अतुल अरुण उत्पात यांनी उपस्थितांना लोक अदालतीचे महत्व पटवून दिले. जास्तीत जास्त पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. घाटंजी तालुक्यातील एकूण 51 बादपूर्व प्रकरणे व एकुण 185 प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात आली.
निकाली प्रकरणांमध्ये वादपूर्व प्रकरणांचे तोडजोड मुल्य 88 लाख 96 हजार 768 रुपये व प्रलंबीत प्रकरणांचे तोडजोड मुल्य 22 लाख 12 हजार 457 रुपये होते.
प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवण्यासाठी दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, घाटंजी अतुल अरूण उत्पात व सह दिवाणी न्यायाधीश अनिकेत अरुण कळमकर तसेच सर्व विधिज्ञ मंडळी यांनी प्रयत्न केले. यावेळी घाटंजी शहर व तालुक्यातील पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थीत होते. लोक अदालत यशस्वी होण्यासाठी न्यायालयातील कर्मचारी वृंद, पोलीस ठाणे घाटंजी व पारवा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती, घाटंजी अंतर्गत अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, विविध बँका तसेच पतसंस्थांचे अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
पुढील राष्ट्रीय लोक अदालत दि. 10 मे 2025 रोजी ठेवण्यात आली आहे. तालुका विधी सेवा समिती, घाटंजी यांच्या वतीने पुढील राष्ट्रीय लोक अदालतीच्या दिवशी देखील अधिकाधिक पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.