घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ७ अन्वये आमडी ग्रामपंचायतच्या सरपंच जयमाला विठ्ठलराव वाडगुरे (घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे गट) यांना यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी अपात्र घोषित केले होते. या प्रकरणात सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन क्रंमाक १६६५/२०२५ दाखल केले होते. या प्रकरणी ॲड. मुग्धा चांदूरकर यांनी युक्तीवाद केला. ॲड. मुग्धा चांदूरकर यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी स्थगीती दिली आहे. याचीकाकर्त्या सरपंच जयमाला वाडगुरे यांची बाजू ॲड. मुग्धा चांदूरकर यांनी मांडली.
आमडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली होती. त्यात सरपंच पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे गटाच्या सौ. जयमाला वाडगुरे यांची निवड झाली होती. नियमानुसार वित्तीय वार्षिक वर्षात ४ ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. मात्र, आमडी येथील सरपंच सौ. जयमाला वाडगुरे यांनी दोन ग्रामसभा घेतल्याचा आरोप ग्रामसभा सदस्य पंकज अनंतराव ठाकरे (रा. जुनोनी) यांनी करुन अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे, सचिव ग्रामपंचायत आमडी ता. घाटंजी व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांच्या विरुद्ध अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ७ अंतर्गत प्रकरण दाखल केले.
सदर प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या न्यायालयाने आमडी येथील सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे यांना अपात्र घोषित करण्यात आले. तर सचिव ग्रामपंचायत आमडी विरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या न्यायालयाने दिले होते. सदर प्रकरण नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल करण्यात आले. त्यावरुन आमडी येथील सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी स्थगीती दिली. सौ. जयमाला वाडगुरे यांची बाजू ॲड. मुग्धा चांदूरकर यांनी मांडली. घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांचे कडे राजकीय दबावाखाली चुकीचा व खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक तथा माजी सरपंच अभिषेक शंकरराव ठाकरे यांनी केला आहे.