जळगाव : मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला असल्याचे मी नाव घेऊन सांगतो. याचे सबळ पुरावे मी ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ या पुस्तकात देणार असल्याचे खडसे यांनी म्हटले. भाजपात नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा प्रखर टीका केली. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा वा स्वस्थ बसणारा नाही. पक्षाच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोवर भांडत राहणार, असे खडसे म्हणाले. एकनाथराव खडसे यांच्याकडून भाजपाला घरचा आहेर देण्यात आला आहे.
एकनाथ खडसे यांच्यावर लिहिण्यात आलेले “जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुक्ताईनगर येथील खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने झाला. या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा केला. आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर असतांना मला संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल यावेळी माजी मंत्री खडसे यांनी केला. मला मंत्रीमंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट कापले, याचे मला दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून माझ्या बदनामीचा कट आपल्याच लोकांनी केल्याचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. या कटकारस्थानाचे पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे मी ते पुरावे जनतेसमोर आणणार आहे, असे खडसे यांनी म्हटले.