घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक चीट्टी कालिदास राजाराव (वय ३४) यांनी केलेल्या तक्रारीवरुन फरहान ट्रेडर्सचे संचालक निलोफर सैयद फिरोज (वय ५८), राॅयस एटंरप्राईजेसचे संचालक सैय्यद फरहान सैय्यद फिरोज (वय ३०) यांचे विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ३१८ (३) (४), ३ (५) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
संशयीत आरोपीने ॲड. बिसेन उमेशकुमार कोठीरामजी यांच्या मार्फत फौजदारी जामीन अर्ज क्रंमाक ९४/२०२५ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांच्या न्यायालयात दाखल केला असून सदर जामीन अर्जावर आज १ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होत आहे.
हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे यवतमाळ येथे कार्यालय असून वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. कळंब ते यवतमाळ रेल्वे स्टेशनपर्यतंचा पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट आंध्र प्रदेश येथील हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. पुलाचे बांधकाम करण्यासाठी सिमेंट व इतर साहित्याचा पुरवठा करण्याकरीता भोसा (यवतमाळ) येथील फरहान ट्रेडर्सच्या संचालक निलोफर सैयद फिरोज, राॅयस एटंरप्राईजेसचे संचालक सैय्यद फरहान सैय्यद फिरोज यांच्या सोबत तोंडी करार करण्यात आला होता.
हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीने वेळो वेळी RTGS करुन ९९ लाख ९९ हजार ९९८ रुपये पुरवठादारांना दिले होते. परंतु, एक वर्षाचा कालावधी लोटुनही सिमेंट व इतर पुल बांधकाम साहित्याचा पुरवठा केला नाही. त्यावरुन आरोपी निलोफर सैय्यद फिरोज, सैय्यद फरहान सैय्यद फिरोज या दोघां विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.