फडणविसांना पंतप्रधानपद नको का?

आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे नुकतेच नागपूरला जाऊन आले. त्यांनी म्हणे संघाला वंदन केले. नेत्यांना वंदन केले. संघाचे नेते डॉ. हेडगेवार, मा. गोळवलकर गुरुजी, डॉ. मोहन भागवत यांना नतमस्तक झाले. गेल्या वर्षी जे.पी. नड्डा यांच्या मुखकमलातून त्यांनी “भाजपा आता मोठा आणि सशक्त झाला, संघाची आम्हास गरज उरली नाही”.अशी शब्दबाण फेक करवली होती. शिवाय पदावर आरुढ झाल्याच्या 11 वर्षानंतर त्यांना संघाची आठवण झाली. ते मातृसंस्थेत परतले. त्यांनी संघाची आणि संघकार्याची वारेमाप स्तुती केली. ही अफाट स्तुती सुमने पाहून आरएसएसचे काही वीर बेशुद्ध पडण्याच्या बेतात होते. पण तसे काही झाले नाही.

इकडे महाराष्ट्राचा भोंगा म्हणवले जाणारे उबाठाचे  खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन मोदींजींच्या नागपूर दौ-याचा अर्थ  काढला. मोदीजी हे 17 सप्टेंबर 2025 रोजी वयाची 75 वर्ष पूर्ण करीत आहे. ते निवृत्त होतील. ती तारीख 18 सप्टेंबर 2025 असेल. असे काहीसे ते वदले. सूतोवाच करते झाले. पण मोदी भक्तांना ते काही आवडले नाही. मोदीजींची जागतिक लोकप्रियता पाहता त्यांना मुदतवाढ मिळेल यासाठी हा दौरा होता असे काहीसे राऊत बरळले. भाजपाने शिस्त पालन करत अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांना वयाच्या पंचाहत्तरीचे कारण दर्शवत अडगळीत टाकले आहे.

“पण….  परंतु तसे मोदीजीबाबत आता काही होणार नाही” असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागलेच खुलासा करते झाले. महाराष्ट्राचा माणूस,  तो देखील मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही सर्वांची फार दिवसांची इच्छा. त्या दृष्टीने विचार करता ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार यांचा क्रमांक पहिला येतो. पण पंचाहत्तर वर्षाचा चालत नाही. तेथें 82 ते 84 चा कसा चालणार? दुसर मराठी सुशीलकुमार शिंदे. माणूस दलित आहे. पण ते ही पंचाहत्तर पार. शिवाय दोन्ही काँग्रेसचे. काँग्रेस पक्ष भर झोकात होता तेव्हा दिल्लीच्या वर्तुळात म्हणे 11 नेते होते. त्यांची 11 तोंडे 12 दिशांना होती. शिवाय एकमेकांचे पाय ओढण्याची खेकडा वृत्ती. ती कॉंग्रेस आणि भाजपात सारखीच आहे म्हणतात. पण … आमचे फडणवीस लागलीच  इन्कार करतील. त्यांनी नाही का इन्कार केला राऊतांचा. ते म्हणजे संजय राऊत एवढेच म्हणाले की “पुढचा पंतप्रधान महाराष्ट्रातून येईल आणि तो मराठी असेल”. झाले लागलीच …. लागलीच फडणवीस महाशय म्हणाले “आमच्या संस्कृतीत बाप म्हणजे पिताश्री हयात असतांना त्यांच्या वारसदाराची चर्चा करत नाही. ती मोगलाई झाली. सन 2029 मध्ये मोदीजीच पी.एम. असतील.

फडणवीस महाशय तसे भोळे. राऊतांनी नाव कुणाचेच घेतले नाही. मध्यंतरी नितीन गडकरींची चर्चा होती. या गडकरीनी आपण त्या रेस मध्ये नाही असा खुलासा केला होता. शिवाय या गडकरींना म्हणे “भोवळ” आल्याची दृश्ये चॅनल्सवरून वारंवार दाखवण्यात आली. भर सभेत कोसळणारे गडकरीजी.  हे पाहून महाराष्ट्राचेही मन हेलावले.  पण गडकरींना भोवळ आल्याचे दृष्य दाखवण्याचे प्रयोजन का? हे काम कुणाचे? लागलीच दोन हुशार माणसांची नावे पुढे आली. पण ते दोघे परप्रांतीय. स्पर्धेतील लोकांना बाजूस सारा, अडगळीत टाका असा राजकारणातला नियम सांगितला जातो. तो फडणवीस यांना माहित नाही असे नाही असे म्हटले जाते.

भाजपा नेत्यांच्या गर्दीत फडणवीस तसे तरुणच. त्यांच्या हाती वय आहे. त्यांना लंबी रेस का घोडा म्हटले जाते. ही स्तुती नसून वस्तुस्थिती आहे. आता खा. राऊत मराठी माणसासाठी स्वप्न बघत आहेत. कदाचित त्यांचे हिरो उद्धव – आदित्य असतील. सत्तासुंदरी स्वयंवर करत असेल. तर फडणवीस यांचा आजचा नम्र नकार ही आजची स्वामीनिष्ठा – नम्रता असली तरी आजच नकार का?  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here