अपहार व फसवणूक प्रकरणी सरपंच गजानन शेंडे निर्दोष

On: May 15, 2025 11:41 AM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा ग्रामपंचायतचे सरपंच गजानन कर्णुजी शेंडे यांची 2 लाख 2 हजार 400 रुपयांच्या फसवणूक प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सरपंच गजानन शेंडे यांच्या वतीने ॲड. गणेश धात्रक यांनी बाजू मांडली.

सायतखर्डा ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव संतोष किसनराव माहुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी पारवा पोलीस स्टेशनला गु.र.न. 12/14 नुसार गजानन कर्णुजी शेंडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 409, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे.कॉ. दिगांबर अलामे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणी एकुण नऊ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती.

गजानन शेंडे यांच्या वतीने अ‍ॅड. गणेश धात्रक यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच गजानन शेंडे यांच्याकडून जप्त करण्यात आलेली 1 लाख 74 हजार 800 रुपयांची धनराशी शासन तिजोरीत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment