मुंबई : अॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का? असा थेट प्रश्न खडसेंनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत का वळवले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाल्याचा मुद्दा खडसे यांनी उपस्थित केला.
माझ्यावर झालेल्या केवळ आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. आरोप झालेल्या पक्षातील इतर मंत्र्यांना तो न्याय का लावण्यात आला नाही? असा प्रश्न एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला आहे.
अॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वर्ग करण्यात आले. तो सदुपयोग असेल तर पदाचे असे अनेक सदुपयोग मी पाहिले आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुभाष देशमुख यांच्यासह अनेक जणांवर आरोप झाले होते. त्यांचे राजीनामे का घेतले नाही ?, असा सवाल खडसे यांनी विचारला. मी देवेंद्र फडणवीस यांना सन २००५-२००६ पासून बघत आहे. ते एक अभ्यासू आणि होतकरु असल्यामुळे मी त्यांना संधी दिली. अनेक वेळा विधानसभेत त्यांना पुढे केले. मात्र आपण ज्यांच्यावर प्रेम केले ते पुढे जाऊन अशा पद्धतीने उतराई होतील असे वाटले नव्हते अशा शब्दांत एकनाथराव खडसे यांनी आपली नाराजी प्रकट केली आहे.