धुळे – दुस-या महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध पत्नीला माहित पडल्यामुळे पत्नीचा पेस्टीसाईडचे इंजेक्शन देऊन खून केल्याची घटना उघडकीस आल्याने धुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या खून प्रकरणी मयत विवाहीतेचा पती, त्याची आई, बहिण आणि विवाहीत प्रेयसी अशा चौघांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुजा बागुल असे मयत विवाहितेचे नाव आहे. कपील बाळू बागुल, कपीलची आई विजया बाळू बागूल, कपीलची बहिण रंजना धनेश माळी (रा.छत्रपती संभाजीनगर) आणि कथित विवाहीत प्रेयसी अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. धुळे शहरातील वलवाडी शिवारात ही घटना घडली.
भारतीय सैन्यात कारकुन म्हणून कामाला असलेल्या कपील बागुल याचे जळगाव जिल्ह्याच्या भडगाव येथील पुजा सोबत सन 2010 मधे लग्न झाले होते. दोघांना अनुक्रमे नऊ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. धुळे येथील जयहिंद महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना कपीलचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळून आले होते. दोघांचे प्रेमसंबंध असले तरी कपील आणि त्या तरुणीचा विवाह झाला नाही. सन 2007 मधे त्या तरुणीचा अन्य तरुणासोबत विवाह झाला आणी तिच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते. कपीलच्या त्या प्रेयसीला तिच्या पतीपासून अनुक्रमे सतरा आणी तेरा वर्षाच्या दोन मुली आहेत. कालांतराने कपील आणि त्याची ती विवाहीत प्रेयसी दोघे एकमेकांना पुन्हा भेटू लागले आणि त्यांच्यात पुन्हा पुर्वीसारखे प्रेम बहरले. दोघे एकमेकांना लॉजमधे गुपचूप भेटू लागले.
पती कपील आणि त्याची पुर्वाश्रमीची प्रेयसी या दोघांचे प्रेमसंबंध त्याची पत्नी पुजा हिला समजले. त्यामुळे त्याने तिला जीवे ठार करण्याचा कट रचला. त्याने तिला पेस्टीसाईडचे इंजेक्शन दिले. त्यानंतर तिच्या मुखातून फेस येण्यास सुरुवात झाली. तिचा मृत्यू होईपर्यंत दिड तास त्याने वाट पाहिली. तिने माहेरुन पैसे आणावे यासाठी तो तिला मारहाण देखील करत होता अशी माहिती समोर आली आहे. दोघांचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता. मात्र आपल्या मुलीच्या संसाराचा विचार करता तिच्या माहेरच्या सदस्यांनी एक पाऊल मागे घेतले होते.
मयत पुजाला स्थानिक श्री गणेश हॉस्पीटलमधे दाखल केल्यानंतर तिला सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मयत पुजाचा भाऊ आणि नातेवाईक तातडीने भडगाव येथून धुळे सामान्य रुग्णालयात दाखल झाले. राज्यात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युचे प्रकरण गाजत असतांना धुळे येथे घडलेल्या या घटनेची देखील त्यात भर पडली आहे.