जळगाव : शेतात गाडलेले चोरीचे 33 मोबाईल पोलिस तपासात बाहेर आले आहेत. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाई आणि तपासात हा प्रकार बाहेर आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनला मोबाईल चोरीचे आणि रावेर पोलिस स्टेशनला मोबाईल गहाळ झाल्याच्या घटना या तपासातून उघडकीस आल्या आहेत. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे मोबाईल चोरी अथवा गहाळ झाले असतील त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्यांच्या मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकासह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक 21 जून रोजी जळगावला शनिवारच्या आठवडी बाजाराच्या गर्दीत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धानके, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, पो. कॉ. रतन गीते आदी गस्त घालत होते. या गस्ती दरम्यान एका संशयितांसह त्यांच्या सोबत असलेले दोघे अल्पवयीन मुले अशा तिघांवर पोलिस पथकाला संशय आला. तिघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीदरम्यान त्यांच्या कब्जात चार मोबाईल मिळून आले. या मोबाईलबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून योग्य ती माहिती पुढे आली नाही. त्यामुळे त्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली.
जळगाव भुसावळ दरम्यान महामार्गावरील स्वामीनारायण मंदिराजवळ पाल टाकून रहिवास करत असलेल्या शेतात खड्डा करुन तिघांनी चोरीचे 33 मोबाईल पिशवीसह पुरुन ठेवले होते. 4 लाख 9 हजार रुपये किमतीचे चोरीचे 33 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. जळगाव शहरातील शनिवारच्या आठवडी बाजारासह जिल्ह्यातील विविध बाजारात गर्दीचा गैरफायदा घेत हे मोबाईल चोरी करण्यात आले होते.
मोबाईल चोरी करणा-या तरुण नोरसिंह गुजरिया या तरुणासह त्याच्या दोघा अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुरन 449/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तरुण नोरसिंह यास अटक करण्यात आली आहे. तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या 33 मोबाईल पैकी चार मोबाईल रावेर पोलिस स्टेशन हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार महेश मोगरे यांच्या ताब्यात ते चार मोबाईल देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हेमंत जाधव करत आहेत. जळगाव शहर व जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरी झाले असतील त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला त्यांच्या मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकासह संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.