जळगाव : टाळ्या पिटून रेल्वेतील प्रवाशांकडून जबरीने, प्रसंगी ऑनलाईन पैसे वसुल करणा-या तृतीयपंथीयांच्या टोळीला कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. अटकेतील सहा किन्नर आणि त्यांचे दोघे प्रमुख सूत्रधार यांना रेल्वे न्यायालयाने एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अटकेतील सर्व तृतीयपंथी जळगाव कारागृहात रवाना झाले आहेत. वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या आदेशाने हा कारवाईचा प्रवास झाला.
भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन जाणा-या रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथी टोळ्या प्रवाशांना धमकावून जबरीने पैसे वसुल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. रेल्वेच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के.एन. राय, भुसावळ आरपीएफ पोलिस निरीक्षक पी.आर. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली. या पथकाने विविध गाड्यांमधे राबवलेल्या तपासणी मोहिमेत सहा तृतीयपंथी आणि त्यांच्या दोघा मुख्य साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध भुसावळ रेल्वे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.





