घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गाडे व घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी आपल्या वेतनातून पिडीत याचिकाकर्त्याला २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी दिले आहेत. जेसीबी जप्त प्रकरणात घाटंजी येथील याचिकाकर्ता सागर भोयर यांनी ॲड. महेश धात्रक यांच्या मार्फत उच्च न्यायालयात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे व इतरांविरुद्ध याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष या प्रकरणी सुनावणी झाली. दाखल याचिकेनुसार ही घटना ३० नोव्हेंबर २०२४ रोजी घडली होती. घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका शेतात छापा टाकून जेसीबी जप्त केला होता. मिळालेल्या माहिती नुसार घटनास्थळी ट्रॅक्टर सापडले नाही तसेच मुरुम व दगडाचे कोणतेही पुरावे आढळले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने जेसीबी जप्तीची कारवाई बेकायदेशीर ठरवली. दरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी जेसीबी मालकाला ७ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावला होता.
या बाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे (केळापूर) व घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती. केळापूर चे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी १ लाख ५० हजार रुपये व पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी ५० हजार रुपये असे एकूण २ लाख रुपये १५ कामकाजाच्या दिवसांत याचिका कर्ता यांना स्वत: किंवा धनादेश द्वारे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी दिले.






