आमदार खडसेंचा सुडाग्नी भडकला पण शत्रू वाढले

On: July 28, 2025 7:43 PM

आमदार एकनाथ खडसेंच्या दुसऱ्या जावयाला अटक झाल्याने त्यांचा सुडाग्नी आता चांगलाच भडकलाय. अपराध्यांना आता दयामाया नाही पण सर्व माहिती घेतल्यानंतर त्याला अडकवण्याची योजना असल्यास कुणाला सोडणार नाही असा त्यांचा इशारा नामदार महाजनांना उद्देशून असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तारुढ भाजपकडे जाण्यास निघालेल्या खडसेंचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री फडणवीस आणि नामदार महाजन यांनी रोखल्याचे संकेत त्यांनी दिलेत.

दरम्यान त्यांनी राज्य नेतृत्व असलेल्या फडणवीसांना आता “अनाजी पंत”, “टरबूजा” म्हणत नाही असे त्यांनी म्हटले आहे. पण मंत्रीपद गेल्यावर जळगावच्या सुभाष चौकातील जाहीर सभेत “सुपारीबाज” मुख्यमंत्री असून “मी तोंड उघडल्यास संपूर्ण देश हादरुन जाईल” असे विधान त्यांनी केल्याचे अनेकांच्या स्मरणात आहे. अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या समर्थनार्थ भाषणे केली. आमदार सावकारे तेव्हा गैरहजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले हे महाशय खडसे समर्थक पण कश्मीर दौऱ्यावर होते. आता मात्र आपले मंत्रीपद घालवणाऱ्याला गचांडी पकडून जनतेसमोर हजर करु,  त्यांनी ईडी लावली तर आपण सीडी बाहेर काढू अशी आव्हाने पुढील काळात त्यांनी दिली.

इडीच्या धाडी ज्यांच्या इशाऱ्यावर पडल्या त्या किरीट सोमय्यांसोबत हास्यविनोद करतांना काही चॅनलवर ते दिसले म्हणतात. हाती पैसा असला म्हणजे नेते कुणालाही सहज मॅनेज करु शकतात म्हणे. आता त्यांनी आमदार महाजनांशी पंगा घेतल्याचे दिसते. जिल्ह्याचे जेष्ठ नेते असलेल्या खडसेंची आजवरची राजकीय वाटचाल तत्कालीन नेते आमदार सुरेशदादा जैन यांच्याशी कधी दोस्ती तर कधी दुश्मनीने भरलेली आहे. आताच्या कथीत हनी ट्रॅप – सीडी – लोढा प्रकरणात माननीय खडसे व नामदार महाजनांचे हाडवैर प्रसिद्ध आहे.

मध्यंतरी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर जळगाव दौऱ्यावर असताना प्रदेश महिलाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्याशी पंगा घेतला होता. परिणामी खडसे साहेबांच्या शत्रुंमध्ये वाढ झाली. फडणवीसांशी जमवून घेत भाजपा प्रवेश करून महाजनांना अजूनही आपण शह देऊ असे त्यांना वाटत असावे. त्यासाठी पंकजा मुंडे यांना समर्थन देण्याऐवजी तेथे जाऊन मला गृहीत धरु नका असे ते म्हणाले होते हा इतिहास ताजा आहे. अलीकडे हनी ट्रॅप, लोढा, सीडी उल्लेखित प्रकरणात महाजन दोषी असावेत, असले तरी त्यांना वाचवले जात असल्याचा गेल्या आठवड्यात त्यांचा आरोप होता. नंतर पुण्यातल्या रेव्ह पार्टीत त्यांचे दुसरे जावई प्रांजल खेवलकर अडकल्याचे बाहेर आले. पोलिसांना पुण्यातील खराडी धाडीचा हा पहिला रिपोर्ट असला तरी अद्याप फॉरेन्सिक रिपोर्ट बाकी आहे. त्यानंतर खडसे अधिक आक्रमक होतील असे दिसते. पण त्यांच्या शत्रूत आता केवळ फडणवीस, महाजन न राहता आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांची भर पडल्याचे मानले जाते. शिवाय आता खासदार सुप्रिया सुळे पाठराखण करणार म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक गट विरोध करणारच असे म्हटले जाते.

शिवाय सर्व ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे की नाही याची शंका व्यक्त केली जाते. केवळ पाच – दहा टक्के पाळीव पत्रकारांवर त्यांचे राजकारण चालते असे काही गट म्हणत असल्याचे कळते. केवळ वाणी – ब्राह्मणांचा भाजप आपणच राज्यभर वाढवला असे म्हटल्यामुळे हा पक्ष वाढवण्यात योगदान देणारे इतर समाज घटक त्यांच्यापासून दूर गेल्याचे म्हटले जाते. शिवाय गाजत असलेल्या सीडी आपल्या ताब्यात संबंधिताने वारेमाप मागणी केल्यामुळे येऊ शकल्या नाहीत असे कळते. त्यावेळी लोढा यांच्याकडे मुंबईत धाड पडली होती. एक सिडी शंभर ते दीडशे कोटी रुपयांची अशी चर्चा रंगल्याचे समजते. त्यामुळे जळगाव – मुंबई नंतर आता पुण्यात जाऊन पोहोचलेल्या दोन नेत्यांच्या आपसी वैर आणि भांडणाचे हे प्रकरण जनतेला मात्र काय देणार? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment