महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांपासून कोसो दूर आहेत असे त्यांच्या पार्ट वन 2014 आणि आताचा पार्ट टू म्हणजे 2024 – 25 मध्ये जे काही घडले, जे निर्णय झाले त्यावरुन आता बोलण्याची हिंमत कुणी करु शकणार नाहीत. एक मात्र खरे की ते अत्यंत हुशार आहेत बुद्धिमान, चतुर, चाणाक्ष आहेत. यात कुणाचा मतभेद नसावा. पण आता मात्र त्यांच्याकडे निर्णय शक्ती कवडीमात्र राहिली नाही हे अलीकडच्या मंत्र्यांबाबत त्यांनी घेतलेल्या निर्णयातून स्पष्ट झाले.

गत महिनाभरापासून चर्चेत आलेल्या आठ ते दहा मंत्र्यांचे गैरवर्तन, भ्रष्टाचार, दुर्व्यवहार, कायदेशीर – बेकायदेशीर संपत्ती, धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहावर सापडलेली एक कोटी 84 लाखांची रोकड, मंत्र्यांकडे झालेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये नोटांनी खचाखच भरलेली – दिसलेली बॅग, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला नाईट क्लब स्वरुपाचा डान्सबार व तेथून उचलल्या जाणाऱ्या तरुणींबाबत फुटलेली बातमी, व्हिडिओ या सर्व प्रकाराबद्दल आठवडाभरापूर्वी माजलेले मंत्री, आमदार, राजकारणी म्हणवणारे मुख्यमंत्री आता बारा मंत्र्यांना घरी पाठवतीलच असे वातावरण गेल्या आठवड्यात तयार झाले होते. असे असतांना महायुतीतील घटक पक्ष जसे राष्ट्रवादी काँग्रेस – अजितदादा, एकनाथ शिंदे गट यांच्या दबावामुळे फडणवीस मात्र नरमले. इतके हतबल झाले की तिथे दादांचा रमी खेळणारा मंत्री कोकाटे सोडाच पण शिंदे यांच्या एकाही मंत्र्यास हात लावू शकले नाही. त्यांच्या केसालाही धक्का लावू शकले नाही.
हे सर्व घडले मुख्यमंत्र्यांच्या “ब्लू आईड बॉय” मुळे, म्हणजे त्यांचा संकटमोचक समजल्या जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांमुळे. गेल्या दहा पंधरा दिवसापासून ठाणे, नाशिक, मुंबई, जळगाव, जामनेर पर्यंत हनी ट्रॅप राजकारण्यांची बाई बाटलीबाजी, सेक्स स्कॅंडल, महिलांचे गैरवापर प्रकरण वर आले. त्यात मंत्री महाजन यांचे हाडवैरी, माजी मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुण्यात लावण्यात आलेला कथित हनी ट्रॅप, कोकेन हुक्का दारु पार्टी, रेव्ह पार्टी प्रकरणात केलेली अटक आता बुमरॅंग प्रमाणे त्यांच्यावरच उलटू पहात आहे. ही पोलिसांची कथित धाड मिस्टेक मुळे खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचे आमदार खडसे यांचे आरोप भारी पडू लागले आहेत असे दिसते.
आता ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे होत असतांनाच तोंडावर आलेल्या परंतु बिगुल न वाजलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता कुणाही मंत्र्याला नारळ देऊन घरी पाठवणे कोणालाच परवडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे सरकारची प्रतिमा मलीन करणारे मंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे धाडी घालून नामा निराळे राहू इच्छित असले तरी त्यांचे उद्योग दिल्लीपासून लपून राहिले नाहीत. एखाद्या मंत्र्याने गडगंज पैसा कमावला, हॉटेल्स विकत घेतले, 50 लाख किंवा दीडशे कोटीची जमीन कोणाला गिफ्ट दिली, विधानसभेत पत्ते – रमी खेळले त्यात काय फार मोठा अपराध? या सभागृहात आमदारच कायदे करतात आणि ते जनतेने पाळायचे असतात, मंत्र्यांनी नव्हे. पब्लिकची आरडाओरड झाली म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला.
आता पत्ते खेळले म्हणून दुसरी विकेट पाडा म्हणून सांगतात. तुमच्या संकटमोचकाचे कारनामे उघड होऊ लागलेत. त्यांचाही राजीनामा घेणार का असा प्रश्न विचारला जाण्यापूर्वीच फडणवीसांनी सर्व अधिकाऱ्यांना घालवून देत मंत्र्यांना केवळ समज किंवा समज किंवा तंबी देऊन वेळ मारुन नेली. हे आता उघड झाले. भाजपाची केवळ 26 ते 28 टक्के इतकीच मते असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाची त्यात भर पडली आहे. चारच महिन्यात स्थानिक स्वराज्य निवडणुका घोषित होतील. तिकडे ठाकरे बंधू एकत्र आलेत. दिल्लीत सत्ता कमजोर पडू लागली आहे. त्यामुळे नवे संकट निर्माण करु नका असा दिल्लीचा संदेश असावा म्हणून राजनेत्यांनी म्याऊ म्याव चा आवाज काढत माघार घेतली आणि केंद्रही घेणार असे खासदार संजय राऊत म्हणत आहेत ते उगाच नव्हे.









