घाटंजी कृ. उ. बाजार समिती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

On: August 3, 2025 7:31 PM

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व संचालक आशिष सुरेशबाबू लोणकर यांना अपात्र केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. दरम्यान, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांनी दिलेला आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी फेटाळून लावला असुन खारीज केला आहे. तथापि, सदर प्रकरणात याचिकाकर्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन अशोकराव कोठारी यांनी प्रतिवादी अभिषेक ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे सचिव, विभागीय सह निबंधक सहकारी संस्था अमरावती, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी व संचालक आशिष सुरेशबाबू लोणकर यांचे विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

तथापि, सदर प्रकरणात २३ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी, न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या समक्ष सुनावणी झाली. सदर प्रकरणात आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना दिले आहे. पुढील सुनावणी १२ ऑगस्ट २०२५ रोजी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न  खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १७ अन्वये २२ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित केले होते. दरम्यान, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सभापती अभिषेक ठाकरे (WRIT PETITION NO. 5048/2024) व आशिष लोणकर (WRIT PETITION NO. 5052/2024) या दोन संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या आदेशाविरुद्ध आवाहन याचीका दाखल केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी सदर आदेश रद्द करुन सोमवारी (दि. ७/४/२०२५) खारीज केला आहे. तसेच दोन्हीही संचालकांना मुळ कार्यालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी येथे संचालक अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर व इतर शेतक-यांनी दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी कापसाचा सुरू असलेला लिलाव बंद पाडुन रास्तारोको करण्यात आल्याचा आरोप करुन घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीने २७ जानेवारी २०२४ च्या झालेल्या मासिक सभेस ठराव क्रमांक ६ प्रमाणे गैरअर्जदार अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर यांना पदावरुन दुर करण्याबाबतचा ठराव १० विरुद्ध ६ मतांनी (संचालक) पारित करण्यात आला. सदर आदेशाला विचलीत होऊन संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आवाहन याचीका दाखल केली. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी आपल्या आदेशात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ व कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी यांचेवर चुकीची कारवाई केल्याचा ठपका ठेवून ताशेरे ओढले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी दोन्ही याचिका मंजूर केल्या असून याचिकाकर्त्यांना मुळ कार्यालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याचिकाकर्ता अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर यांची बाजु उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर व ॲड. यशोवर्धन सांबरे यांनी मांडली. नितीन अशोकराव कोठारी यांच्या तर्फे वरिष्ठ वकील ॲड. अरधेंतु माउली प्रसाद, ॲड. अनुराग घरोटे तर प्रतिवादी अभिषेक ठाकरे यांच्या वतीने ॲड. सत्यजित देसाई, ॲड. सिद्धार्थ गौतम, ॲड. अनघा देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment