“येन-केन-प्रकारे प्रसिद्धी भवेत पुरुषाः” असे एक सुभाषित आहे. म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचे असेल तर थोरामोठ्यांच्या गाडीला टक्कर मारा. म्हणजे तुम्ही कुणाच्या गाडीला टक्कर मारली त्या थोरा-मोठ्यांचे नाव वर्तमानपत्रात येईलच. शिवाय त्याच्या गाडीला टक्कर मारणारा – कट मारणारा म्हणून तुमचेही नाव प्रसिद्ध होईलच. झाली की नाही तुमची प्रसिद्धी. अगदी हेच सद्ध्याचे आ. जयंतराव पाटील आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्याबाबतीत झाल्याचे काही जुने जाणते म्हणतात.

तसे आजचे नेते आ. गोपीचंद पडळकर हे मान्यवर. त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा कृपा आशिर्वाद असल्याचे सांगितले जाते. तर निखील वागळे यांच्या सारख्या जेष्ठ पत्रकारांसह अनेकांच्या मते फडणवीसांच्या पाळीव सैन्यापैकी ते एक बीनीचे शिलेदार. सन 2014, 2019 पासून हा गडी त्यांच्या काही शेलक्या मुक्ताफळांसाठी प्रसिद्ध. सन 2024 मधे त्यांना फडणवीसांनीच भाजपात आणले. तिकीट दिले, आमदारही केले परंतु फडणवीस स्वतःला सभ्य गृहस्थ म्हणवत असल्याने विरोधकांच्या अंगावर धावून जाणारे, वाह्यात किंवा शिवीगाळ करणारी फौज त्यांना लागतेच. नव्हे तर आजच्या राजकारणाची ती गरज बनली आहे. नाही तरी काही दुय्यम – तिसऱ्या फळीतील नेत्यांना आपली स्वामीनिष्ठा दाखवण्यासाठी एकसे बढकर एक अशी वाहयात बडबड करून स्वामीनिष्ठा दाखवावी लागते.

आता त्यांचे नाव मोपीचंद असल्याने त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच दाऊदच्या मुसक्या बांधून आणू, एंरॉन समुद्रान बुडवू असली वक्तव्ये केली. आजच्या घडीला फडणवीसांची जी पिलावळ सांगितली जाते त्यात आ. नीतेश राणे, आ. पडळकर, मोहित कंबोज, आ. सदावर्ते, सदाभाऊ खोत आदी मान्यवर मंडळी सांगितली जाते. तेव्हा आ. पडळकर यांनी जीभ घसरल्यासारखी भाषा वापरून जयंतरावांवर जी टीका केली त्यावर खुद्द शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना एक फोन केला. त्यावर म्हणे फडणवीसांनी पडळकरांना एक समज दिली. पण ती देताना पडळकर यांना भाजपात उज्वल भविष्य असल्याची पुस्ती जोडली. त्यावरुन ही समज खरे तर, “मी मारल्या सारखे करतो – तु साल खाजवल्यासारखे कर” या स्वरुपाची म्हटली जात आहे. पडळकरांनी जयंतरावांबद्दल वापरलेली भाषा , केलेली विधाने यामुळे त्यांचे आका म्हणजे फडणवीस जाम खुश झाले असतील. पण जयंतराव शांत राहिले आहे.
एकंदरीत त्यांना थर्ड क्लास उत्तर द्यायचे नसावे. एक मंत्रीपद रिझर्व ठेवल्याचे निरोप पाठवूनही जयंतराव शरण आले नाहीत हे पाहूनच ही खेळी फडणवीसांनी केली असावी असे आता बोलले जात आहे. ही बाब एव्हाना शरद पवार, जयंतरावांसह अनेकांच्या लक्षात आली असेलच. कारण शरद पवारांचे राजकारण भरात होते तेव्हा ते स्वत: म्हणजे शरद पवार, स्व. वसंतदादा पाटील, राजाराम पाटील असे तिन मातब्बर पहिलवान राज्याच्या राजकारणात होते. तेव्हा या क्षेत्रात ना. फडणवीस, ना. पडळकरांचा जन्मही नव्हता म्हणे. तेव्हा आता हा सामना जयंतराव विरुद्ध फडणवीस असा झाला आहे. गाठ शरदरावांशी, सातारा सांगलीशी आहे. जसा धनंजय मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम झाला तसा यांचाही उद्या होऊ शकतो असे म्हटले जाते. मुख्यमंत्र्यांनी धनगरांनाही आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्यावरुन “क्या हुवा तेरा वादा” असे म्हणून त्या वचनाची आठवण करून दिली होती. तेव्हा “भुलुंगा मै जिस दिन उसे, ओ जिन्दगीका आखरी दिन होगा” असे उत्तर आले होते. म्हणजे फडणवीस साहेबांनी एक-दोन शतायुषी झाले तर धनगरांना आरक्षण – एस.टी.त जाण्यासाठी 100 ते 200 वर्ष वाट पहावी. आ. गोपीचंदराव हे विसरले तसे धनगर बांधव देखील विसरले? पहिल्या गोपीनाथरावांनी दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला इथे आणला? एंरॉन कोणत्या समुद्रात बुडवली? कुणाची नाव बुडणार?








