नवी दिल्ली : केंद्र सरकार संसदेची नवी इमारत उभारणार आहे. त्या बांधकामाचा मक्ता टाटा ग्रुपला देण्यात आला आहे. नवीन संसद इमारतीच्या बांधणीचे कंत्राट 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले आहे. संसद भवन उभारण्यासाठी कंत्राटदारांच्या स्पर्धेत 7 कंपन्यांची नावे आली होती. मात्र टाटाने हे काम मिळवले आहे.
टाटा प्रोजेक्ट लिमिटेड, लार्सन एंड टूब्रो लिमिटेड, आईटीडी सीमेंटेशन इंडिया लिमिटेड, एनसीसी लिमिटेड, शपूरजी पलोनजी अँड कंपनी प्राइवेट लिमिटेड, उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम लिमिटेड आणि पीएसपी प्रोजेक्ट्स लिमिटेड अशा विविध कंपन्यांनी संसद भवनच्या इमारतीचे कंत्राट मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले होते. अखेर सर्वात कमी बोली लावल्यामुळे टाटा ग्रुपला हे काम मिळाले.
पावसाळी अधिवेशनातच या नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे. संसद भवनच्या नवीन इमारतीमध्ये काही मिनारच्या आकृतींचा समावेश करण्याचे म्हटले जात होते. मात्र अशोक स्तंभाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. या इमारतीत अशोक स्तंभ दिसणार आहे. आताच्या संसदेच्या इमारतीसमोरच ही नुतन इमारत राहणार आहे. हे काम 21 महिन्यांत पूर्ण होणार आहे.