आज दोन ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती. सन 1947 मधे भारत स्वतंत्र झाला. या दिवशी आम्हास राजकीय स्वातंत्र्य लाभले. इंग्रज हा हिंदुस्थान सोडून गेले. त्यासाठी महात्मा गांधीजी यांनी 1930 ते 1947 अशी सतरा वर्ष अहिंसा चळवळ चालवली. त्याचे हे फलित. त्याचं बापू यांची आज जयंती. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असल्याचा मंत्र दिला होताच. त्याच्यानंतर महात्मा गांधी युग आले. 1936 ला खानदेशात फैजपूरला काँग्रेस पक्षाचे अधिवेशन झाले. त्याच वर्षी म्हणे ब्रिटनचे एक वजनदार मंत्री महोदय जर्मनीत हिटलरला जाऊन भेटले. या मंत्र्याने म्हणे तक्रार केली की भारतात कुणी मोहनदास गांधी चळवळ चालवून आमच्या पुढे मोठा अडथळा आणतो आहे. त्यावर हिटलर उत्तरला की गोळ्या घाला नेत्याला आणि आंदोलकांना. त्यावर पुन्हा तो म्हणाला तोच प्रॉब्लेम. या गांधींचे अहिंसा, सत्य, असहकार लढा आहे.

भारताला अहिंसा म्हणजे शस्त्र नका उचलू असा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची शस्त्र वापरून हत्या झाली. आता कुणी राहुल गांधी यांना गोळी घालण्याची धमकी दिली म्हणे. म्हणजेच अहिंसेकडून हिंसेकडे आमचा प्रवास आहे का असा प्रश्न विचारावासा वाटतो. त्यांनी खरे बोला, खोटे नको, कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा असे सांगितले. स्वदेशीचा मंत्र दिला. चरखा दिला. तेव्हा एक पिढी खादी – धोतर धारी, गांधी टोपीधारी बनली. त्यांची स्वार्थत्यागाची शिकवण होती. पण आम्ही आज 77 वर्ष पुढे आलो. मोबाईल, कॉम्प्युटर, डिजिटल क्रांती झाली. टीव्ही, फेसबुक, चॅनेल्स, सोशल मीडिया, ओटीटी असे हाताळतो.
इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले. आमचा भरपूर छळ केला. सरकारविरुद्ध बोलणाऱ्याला तुरुंगात टाकले. त्यांनीच भारतात रेल्वे आणली. क्रिकेटही आणले. जालियनवाला बाग हत्याकांड घडवले. आमची हजारो माणसे ठार मारली. मग कुण्या रँड साहेबांचा आमच्या कुण्या भारतीयाने ब्रिटनमध्ये जाऊन बंदुकीने मुडदा पाडला. इंग्रजांनी म्हणे सन 1860 साली कायदा आणून भारतीयांच्या हातून लाठ्या, काठ्या, बंदुका, तलवारी गुप्त्या जांबिये, चाकू, सुरे काढून घेतले. ही शस्त्रे काढून पोलिसांकडे दिली. शस्त्र वापरण्याचा आदेश मुलकी अधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टर, तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांना दिला. हा सर्विस रिवाल्वर मधून कोणी अधिकारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करू शकतो हे काही नोकरशहांनी केले. आम्ही वीरश्री विसरलो. इंग्रजांपासून क्रिकेट शिकलो. या पाश्चात खेळावर आमचे एवढे प्रेम बसले की त्या लडाख मधल्या कुण्या वांगचुक साठी रस्त्यावर येण्याऐवजी आम्ही हजारो लोक पाकिस्तानचा आमच्याकडील गोळीबारात आमचे पर्यटक काश्मिरात ठार मारो की सैनिक मारो हे सारे विसरून क्रिकेट मॅच पाहतो, गरबा खेळतो.
आम्ही मराठी आहोत हेच विसरलो. हिंदुत्व जाणतो. ते “पाकडे”, त्यांना हरवले की जोश चढतो. सिनेमा टॉकीज मध्ये गेल्यावर ढाई किलो का हातवाल्याच्या प्रेमात पडतो. पडद्यावर अन्याय करणाऱ्या पोलिसांना पिटून काढणारा हिरो आवडतो. पण सिनेमागृहातून बाहेर आल्यावर सारे विसरतो. कुणीही राज्याचा मुख्यमंत्री होवो. केंद्रात कोणाचीही सत्ता येऊ देत, काहीही करो सर्व चांगलेच असे समजतो. कोणी देशात लोकशाही म्हणतो. कुणी हुकूमशाही येऊ घातल्याचे म्हणतो. कुणी फॅसिस्ट बोकाळल्याचे म्हणतो. कुणी 75 वर्षे विरुद्ध अकरा वर्ष म्हणतो. कुणी पाकिस्तान प्रेमींना शिव्या घालतो. कुणी आमचे कितीही सैनिक हाणले मारले तरी आम्ही प्रतिक्रिया देत नाही. कारण बॉर्डरवर म्हणजे सीमेवर आम्हास बंदूक घेऊन जायचेच नाही.
देशावर, राज्यावर किती कर्ज झाले त्याची चिंता नाही. वैयक्तिक कर्जापोटी आत्महत्या करणाऱ्यांची काळजी नकोच अशी अलिप्त भुमिका. कोणी मुख्यमंत्री पाच वर्ष, दहा वर्ष, तीन वर्ष राहो, कुणी 70 हजार कोटी खाओ, स्वर्गीय नरसिंहरावांच्या मते 500 महाजन (Elit) लोकांचा क्लबच हा देश चालवत आहोत. त्यात पवार कॅम्प, मराठवाडा कॅम्प, सातारा कॅम्प, आलटून-पालटून तेच तेच राजकीय नेते आम्ही निवडून देतोय. शिंदे, ठाकरे, फडणवीस, जोशी, कुलकर्णी, चव्हाण, शिवाजीराव पाटील कॅम्प यातून कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आम्हास महागाई भुखमरी बेरोजगारीचा सामना करावा लागेलच असे 30 ते 40 टक्के लोक मानतात. कारण कोणीही सत्तेवर आले तरी आमच्या परिस्थितीत काय फरक पडणार असा प्रश्न विचारणारे निळू फुले भेटतातच. तुम्हास काय वाटते? आता महात्मा गांधी नाहीत. दुसरा लढा कोण लढणार?








