मुंबई : मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.
मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. मुंबईतील सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. हे आदेश मुंबई शहरात ३० सप्टेंबरपर्यंत राहणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी राज्य शासनाकडून लॉकडाउनच्या फेज निहाय शिथिलता (मिशन बिगीन अगेन) संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई पोलिसांकडून हा आदेश देण्यात आला आहे.
यात कोणतेही नवीन निर्बंध नसल्याची पोलीस अधिकारी एन. अंबिका यांनी दिली. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या कालावधीत प्रवासाची सवलत राहणार असणार आहे. मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स, किमान सहा फुटांचे अंतर, चेह-यावर मास्क, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडणे अशा अटी राहणार आहेत.या अटींचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकार टप्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत असली तरी कोरोना रुग्णांची संख्या मात्र पुन्हा वाढत असल्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.