खान्देशचे एकनाथराव खडसे यांनी सन 1995 च्या सेना भाजपा युती सरकारमधे पाटबंधारे मंत्रीपद भुषवले. त्यानंतर सन 2014 मधे मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा जाहीर करुन बसले. त्यांची ती संधी हुकली. दिल्लीच्या भाजपा श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणविस यांच्या गळ्यात पडली. हा निर्णय येईपर्यंत राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर चॅनल्सवर गाजलेल्या अनेकांची नावे लॉबींग झाली. त्यावेळी याच पदासाठी चर्चेतील एक नाव विनोद तावडे यांचे होते. मुख्यमंत्री कुठलाही करा पण तो “तोडीपाणी” वाला नसावा असे विनोद तावडे यांनी अॅंकरच्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले होते. त्या उत्तराची क्लिप मुलाखत एका चॅनलवर वारंवार चालवण्यात आली होती. मुख्यमंत्री कोण असावा यापेक्षा तो कसा नसावा? हा एक सुचक इशारा होता. ते देखील स्पर्धेतील इच्छुक होतेच.
दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी हार्ड रॉक (कठीण खडक) एवजी सॉफ्ट फडणविसांची निवड केली. त्यानंतर नाथाभाऊंना बारा खात्याचा पदभार दिला गेला. त्यापुढील वाटचालीत त्यांचे मंत्रीपद गेले. तत्पुर्वी भोसरीचे जमीन खरेदी प्रकरण गाजले. प्रचंड बेनामी संपत्तीचे आरोप झाले. खडसेंनी पुरावे मागीतले. दमानीया तोफ धडाडली. क्लिन चिटचा डाव रंगला. मधल्या काळात मुख्यमंत्री फडणविसांवर जळगावच्या सुभाष चौकातील सभेत खडसे यांनी “सुपारीबाज” अशा शब्दात हल्ला चढवला. आपले मंत्रीपद घालवणा-या भजपातल्या त्या मंत्र्याला जनतेसमोर खेचून आणू म्हणून गर्जना झाल्या. जिल्ह्यात भाजपाचे दुसरे सत्ता केंद्र म्हणून उदयास आलेले नंतर मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक म्हणून ओळखले गेलेले गिरीषभाऊ महाजन यांच्या दिशेने अंगुली निर्देश करत इशारेबाजी झाली.
या पार्श्वभुमीवर राज्यात भाजपा सत्तेची पाच वर्षांची सलग टर्म पुर्ण करणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. सत्तेत्तील भागीदार शिवसेने सोबतची त्यांची रोजची भांडणे महाराष्ट्राने पाहिली. अलिकडे सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत एकनाथराव खडसे यांचे तिकिट कापून त्यांच्या सुकन्येला देण्यात आले. त्या गदारोळात नाथाभाऊंवर अन्याय करणारा पक्ष म्हणून भाजपालाही धडा शिकवण्याची भाषा झाली. हा म्हणे कार्यकर्त्यांचा संताप. सत्तेच्या समुद्रात पट्टीच्या पोहणा-याला माशाप्रमाणे जलाशयातून जमीनीवर आणून टाकल्याने नाथाभाऊंनी जमेल त्या व्यासपीठावरुन त्यांच्यावरील अन्यायाचा नगारा बडवला. सोबत प्रिंट आणी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची फौज दिमतीला होतीच. इतकी की एका आघाडीच्या दैनिकाची कोथळी आवृत्ती सुरु झाल्याचा भास व्हावा इतकी सेवा रुजू झाली.
अलिकडे नाथाभाऊंचा वाढदिवस निमीत्ताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा नाथाभाऊ तोफ धडाडली. साडेचार वर्ष सुचक इशारे (बघून घेईन स्टाईल) झाले. यावेळी मात्र नाथाभाऊंनी जाहीरपणे देवेंद्र फडणविस यांनीच अन्याय केल्याचा, त्रास दिल्याचा जाहीर आरोप केला. ज्यांना नाड्या बांधायला शिकवले तेच आता मला देखील अक्कल शिकवायला निघालेत अशा शब्दात त्यांनी सुनावले. माजी मंत्री गिरीष महाजन यांनी मात्र नाथाभाऊ जेष्ठ मार्गदर्शक असा बहुमान देत अंग काढून घेतले. लगेच शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाथाभाऊ यांना फडणविसांशी कुस्ती खेळण्याचा सल्ला दिला. ही कुस्ती म्हणजे मांडवली कुस्ती नसावी असा इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी त्यावेळी दिला.
काही वर्षापुर्वी मुक्ताईनगर हे चंबळखोरे तर पाळधी बिहार बनल्याचा आरोप करणा-या खडसे – गुलाबरावांचे “मेतकुट” जमल्याबद्दल अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या पाच वर्षात गिरीष भाऊंनी नाथाभाऊंचे नेतृत्व मान्य करत सलोखा करावा यासाठी काही “इव्हेंट मॅनेजर्स” मॅनेजर्सनी प्रायोजीत कार्यक्रम राबवले होतेच.आताशा आक्रमक नाथाभाऊंनी फडणविसांवर जाहीर आरोप केले. शिवाय भाजपाच्या माजी मंत्र्यांच्या पी.ए.च्या अश्लील क्लिप्स आपल्याकडे आहेत याबाबत हवे तर जामनेर भागातील लोढा यांना विचारा असा संदर्भ देत नाथाभाऊ जिल्ह्यात कुणाची शिकार करु पाहतात याची चर्चा सुरु झाली आहे.
या लोकसभा निवडणूकीच्या धामधुमी पुर्वीच भाजपाचे माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांचे तिकीट कापण्यासाठी अशाच एका अश्लील क्लिपचा वापर करण्यात आला. त्यांचे राजकीय करीअर संपवण्यात आले. त्यांचा अशा प्रकारे पत्ता कापण्याचा उद्योग कुणी कुणाच्या सहकार्याने केला याची जिल्ह्यात अनेकांना माहिती असली तरी योग्य वेळी राजकीय पतंग कापण्याचा डाव टाकला जातो.
यात भरीस भर म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नाथाभाऊंच्या वाढदिवसाला हजेरी होती. खडसे सारख्यांच्या योगदानामुळे पक्षाला अच्छे दिन आले असे प्रमाणपत्र बहाल करणारे नितीनभाऊ हे देखील नागपुरचेच.फडणविसांना आव्हान देवू पहात असतांना गडकरीजींनी नाथाभाऊंना उत्तम कार्याचा दाखला का देत सुटावे? असा प्रश्न सामान्यांना पडतो. राज्याच्या राजकारणात सुमारे 45 आमदारांचा एक गट गडकरी समर्थक असल्याचे पद्धतशीररित्या सांगितले जाते. नितीन गडकरी राष्ट्रीय राजकारणात आहेत. त्यांची सध्या दिल्लीत कुणालाच अडचण वाटत नसल्याने ते तिथे आरामात असावे. काही वर्षापुर्वी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे त्यांच्या हाती जावू पाहताच गडकरींच्या औद्योगीक क्षेत्रातील नामी बेनामी सांपतीक स्थिती बाबत आरोपांची मालिका वृत्तपत्रातून गाजली. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष ते पंतप्रधानपदाचा संभाव्य उमेदवार असा त्यांचा विचार कुणी करु नये म्हणून वरील डावपेच होते असे म्हणतात.
याबाबत स्वत: गडकरी यांनीच आपणास कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा नसल्याचे स्वत:च स्पष्टीकरण दिले. शिवाय काही समारंभात त्यांना “भोवळ” आल्याची दृष्ये चॅनल्सवर वारंवार दिसली. काही वर्षापुर्वी महाराष्ट्रात भाजपाच्या नेतेपदी फडणवीस की गडकरी? फडणवीस पाच वर्ष पुर्ण करणार की गडकरींना आणणार? अशा चर्चा सोडण्यात आल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे बहुसंख्य राजकीय नेत्यांचे स्वप्न असते. पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन करुन ते साकारत असतांना केव्हा केव्हा ते पद दुस-याला मिळू नये असे डावपेच होतात. राज्यात भाजपा सध्या विरोधात आहे. विरोधी पक्षनेते पदी पुन्हा फडणवीस आहेत. महाविकास आघाडीचे शिंकाळ तुटण्याची राजकारण्यांना प्रतिक्षा आहे. तसे झालेच तर आपली जागा आजच रिझर्व्ह करण्यासाठी काहींचा आटापिटा आहे. फडणविसांचे घर जाळण्याच्या उपक्रमात भाजपाचेही घर जाळण्याची ही तयारी म्हणायची का? शिवसेनेसह रा.कॉ. – कॉंग्रेसला भाजपात तोडफोड हवीच. नाथाभाऊंना हवा देवून फडणवीस नेतृत्वाचे विसर्जन अनेकांना हवे असल्याचे दिसत आहे.
त्यात गडकरीजींचा उद्याचा रोल काय ? पंचपक्वानांच्या पंगतीतून उठवून लावलेल्या नाथाभाऊंना नेमके काय मिळणार? भाजपात करीअर थांबले? कुणी म्हणत ईडीची भिती आहेच. नाथाभाऊंचा प्रचंड संताप रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर डोळ्यासमोरुन ट्रेन निघून गेल्यावर एखाद्या प्रवाशाला येणा-या संतापाप्रमाणे दिसतो. या मोठ्या माणसांना भावी वाटचालीसाठी शुभकामना!
सुभाष वाघ (पत्रकार) 8805667750