मित्रांसमोर झालेली मारहाण श्यामच्या जिव्हारी —- झाला भावनिक, घेतला गळफास, गेला देवाघरी

On: February 18, 2026 5:57 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : तेरा ते एकोनिस या वयोगटाला “टीन एज” असे म्हटले जाते. “थर्टीन” पासून सुरु झालेले टीन एज “नाईंटीन”ला संपते. इंग्रजी भाषेत या वयोगटाचा उल्लेख करतांना शेवटी टीन असा शब्द येतो. त्यामुळेच या वयोगटाला “टीन एज” म्हटले जाते. अतिशय संवेदनशील असा हा “टीन एज” कालावधी असतो. या टीन एजर मुला मुलींचे मन अतिशय कोवळे आणि संवेदनशिल असते. या वयोगटातील बहुसंख्य मुले मुली भित्री देखील असतात. तरुणपणाकडे वाटचाल करणा-या अशा मुलांच्या हातून अनवधानाने एखादी चुक झाल्यास त्यांच्या मनात भितीचे काहुर दाटून येते. प्रसंगानुरुप योग्य निर्णय घेण्याची  क्षमता नसल्यामुळे ते अजून एखादी चुक करुन घेतात. अशा प्रसंगी त्यांच्या पाठीवर हात ठेवणारा, पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा कुणी तरी सक्षम मार्गदर्शक असावा लागतो. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही तर ती मुले एखादे चुकीचे पाऊल उचलतात. जळगाव शहरापासून जवळच असलेल्या गुलाबराव देवकर महाविद्यालयात बी फार्मसीचे शिक्षण घेणा-या श्याम पाटील या तरुणाच्या बाबतीत असेच काहीसे घडले. प्राचार्यांनी इतर शिक्षकांसमोर पाईपाने केलेल्या मारहाणीमुळे श्यामचे संवेदनशील मन खचले. त्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेत थेट आत्महत्याच केली. या घटनेमुळे जळगाव शहरातील शैक्षणीक क्षेत्रात खळबळ माजली असून या घटनेबाबत विचारमंथन होण्याची गरज निर्माण झाली आहे. जळगाव शहरातील श्याम पाटील याच्या बाबत घडलेला आणि समजलेला हा काय प्रकार आहे ते पाहुया.  

बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील मोताळा या गावी प्रभाकर पाटील राहतात. मुळचे जळगाव जिल्ह्याच्या बोदवड येथील रहिवासी असलेले प्रभाकर पाटील यांना राम आणि श्याम ही दोन जुळे मुले होती. बोदवड या गावासोबत प्रभाकर पाटील यांची नाळ जुळली होती. त्यांच्या जुळ्या मुलांपैकी पहिला मुलगा राम हा बोदवड येथे शेती सांभाळून बीएससीचे शिक्षण घेतो. दुसरा जुळा मुलगा श्याम हा जळगाव येथील गुलाबराव देवकर महाविद्यालयात बी फार्मसीच्या दुस-या वर्षाचे शिक्षण घेत होता. जळगाव शहरातील नेहरु नगर परिसरातील भाड्याच्या खोलीत तो रहात होता. एकंदरीत त्याची शैक्षणीक वाटचाल योग्य रितीने सुरु होती. मात्र अचानक त्याच्या जीवनात असा एक क्षण आला आणि होत्याचे नव्हते झाले.

शनीवार दि. 14 फेब्रुवारी 2026 हा दिवस उजाडला. या दिवशी श्याम नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेला. मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी त्याच्या काही मित्रांचे अन्य विद्यार्थ्यांसोबत वाद सुरु होते. त्या वादात मित्रत्वाची भुमिका घेत श्यामने सहभाग घेतला. दरम्यान चिडलेल्या समोरच्या एका विद्यार्थ्याने श्यामच्या शर्टाची कॉलर पकडली. सर्वांसमक्ष आपली कॉलर पकडल्याचा श्यामला राग आला. रागाच्या भरात त्याने त्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. कॉलर पकडल्यामुळे संतापाच्या भरात श्यामकडून त्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावण्यात आली एवढाच काय तो श्यामचा अपराध असेल. मात्र आपल्या कानशिलात लगावल्याचा समोरच्या विद्यार्थ्याला देखील तेवढ्याच प्रमाणात राग आला. त्यामुळे त्या विद्यार्थ्याने त्याचे समर्थक विद्यार्थी बोलावून शक्ती प्रदर्शन घडवले. वाद वाढण्यास आणि गर्दी जमा होण्यास वेळ लागला नाही.

वाद वाढत असल्याचे लक्षात येताच श्यामने महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांच्याकडे मदतीसाठी धाव घेत याचना केली. आपले प्राचार्य आपल्या पाठिशी उभे राहून आपली मदत करतील अशी खुळी आशा आणि अपेक्षा श्यामने मनाशी बाळगली होती. आपली इभ्रत वाचावी आणि वाद इथेच थांबावा अशी श्यामची अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. सर्व स्टाफसमक्ष प्राचार्य योगेश पवार यांनी श्यामला पाईपाने मारहाण सुरु केली. श्यामला पाईपाने मारहाण होत असल्याचे दृश्य कानशिलात बसलेला विद्यार्थी तिरस्काराने बघत होता. कानशिलात बसलेल्या विद्यार्थ्याकडून कॉलर पकडणे तसेच प्राचार्यांकडून पाईपाने मारहाण होणे या प्रकारामुळे श्याम हतबल झाला. आपला गुन्हा प्रामाणिकपणे कबुल करुनही प्राचार्यांकडून सुरु असलेला मार श्यामची इभ्रत घालवत होता. तो मनातून खचला. त्या दिवशी मार खात इभ्रत घालवून श्याम कसाबसा आपल्या रुमवर पोहोचला.

सायंकाळी त्याने त्याचे वडील प्रभाकर पाटील यांना फोन करुन महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची इत्यंभुत माहिती दिली. त्यावर पलीकडून त्याच्या वडीलांनी त्याला समजावले की “बेटा आपण गरीब माणसे आहोत, कुठे त्या प्रिन्सिपॉलच्या नादाला लागतो”. वडीलांची पडती बाजू ऐकून श्याम अजूनच खचला. त्याने वडीलांना विचारले की आपण गरीब असलो म्हणून मार खातच रहायचा का? आपल्या मुलाचे बोलणे ऐकून प्रभाकर पाटील त्याला म्हणाले की बेटा तु उद्या रविवारी घरी ये. मी आणि तुझे काका, आम्ही दोघे जण तुझ्या प्राचार्यांना भेटून चर्चा करु. वडीलांच्या बोलण्याने श्यामच्या मनाचे समाधान झाले नाही. कोवळ्या वयातील श्यामच्या मनात आपली चार चौघात इभ्रत गेल्याचे शल्य बोचत होते. आपण कोणत्या चेह-याने महाविद्यालयात जायचे. मार खाणारा श्याम म्हणून जायचे की अन्यायाच्या विरोधात लढणारा श्याम म्हणून जायचे असे विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करावी ते उचित न्याय देत नसल्याचे शल्य त्याला बोचत होते.

राजेंद्र गुंजाळ पोलिस निरीक्षक

15 फेब्रुवारी 2026 रविवारचा दिवस उजाडला. वडीलांनी श्यामला घरी बोलावले होते. मात्र तो घरी गेलाच नाही. आदल्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी वडीलांसोबत श्यामचे फोनवर जे काही बोलणे झाले ते त्याचे शेवटचे बोलणे होते. श्याम रहात असलेल्या रुमच्या मालकाने त्याचा भाऊ राम यास सायंकाळी फोनवर एक दुख:द बातमी दिली. श्यामने खोलीत कुणी नसतांना गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची ती बातमी होती. श्यामचा मृतदेह  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट मॉर्टमसाठी नेला असल्याची माहिती श्यामचा भाऊ राम यास समजली.

या घटनेची माहिती मिळताच श्यामचे वडील प्रभाकर पाटील यांनी नातेवाईकांसह जळगाव गाठले. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून पुढील कायदेशीर कामकाजाला सुरुवात केली. घटनास्थळ पंचनामा करतांना मयत श्यामच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने सर्व घटनाक्रम कथन केला होता.

भुषण कोते सहायक पोलिस निरीक्षक

जोपर्यंत प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत श्यामचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीं अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक असल्याचे बघून प्राचार्य योगेश पवार जळगाव शहरातून गायब झाले. त्यांचा मोबाईल देखील नॉट रिचेबल होण्यास सुरुवात झाली.

अखेर सोमवार 16 फेब्रुवारी रोजी श्याम यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भुषण कोते यांच्याकडे देण्यात आला. आपल्याला झालेली मारहाण सिसीटीव्ही फुटेजमधे दिसेल असे श्यामने त्याच्या सुसाईड नोटमधे म्हटले आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या या महाविद्यालयातील सिसीटीव्हीचे अद्याप इंस्टॉलेशन झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव शहरातील देवकर महाविद्यालयात बाहेरचे तरुण बोलावून गुंडगिरी होत असल्याचे या निमीत्ताने म्हटले जात आहे. एकुणच हा प्रकार गंभीर प्रकार आहे. या महाविद्यालयात यापुर्वी देखील अशा घटना घडल्याचे म्हटले जाते. मात्र पोलिस दफ्तरी तशा नोंदी नाहीत. या घटनेनंतर फरार झालेले प्राचार्य योगेश पवार पोलिसांच्या हाती लागतील. त्यांची न्यायालयीन लढाई सुरु राहील. मात्र चारचौघात त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीमुळे आपली इज्जत गेल्याचे शल्य बाळगत ज्या विद्यार्थ्याने आत्महत्या करुन आपला जीव गमावला  त्याचा जीव कोणत्याही परिस्थितीत परत येणार नाही हे नक्की आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment