जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : ज्यावेळी आपल्या देशात टिव्ही अर्थात दूरदर्शनची सुरुवात झाली होती त्यावेळी “इंतजार” नावाची एक मालिका सुरु होती. भुखे को रोटीका, प्यासे को पाणी का इंतजार हे…. असे त्या मालिकेचे शिर्षक गीत होते. या जगात वाट बघण्याचे काम प्रत्येकाच्या नशिबी येत असते. दुकानदाराला ग्राहकाची वाट बघावी लागते. उपाशी व्यक्तीला अन्नाची वाट बघावी लागते. प्रवाशाला बस अथवा रेल्वेची वाट बघावी लागते. बेरोजगाराला नोकरी अथवा कामधंदा मिळण्याची वाट बघावी लागते. थोडक्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट बघावी लागते. मात्र आपल्या समाजातील बेघर लोक रात्री झोपण्यासाठी त्यांची ठरलेली जागा रिकामी होण्याची वाट बघतात हे देखील एक वास्तव आहे. ठरलेले दुकान रात्री केव्हा बंद होईल आणि त्या दुकानाच्या ओट्यावर आपल्याला कधी झोपायला जागा मिळते याची बेघर अथवा फिरस्ते लोक वाट बघत असतात. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, दुकान, बगीचा अशा विविध जागा रिकाम्या होण्याची भटके, फिरस्ते लोक वाट बघत असतात. या जागेवर रात्रीच्या वेळी कुणी नवखा फिरस्ता चुकून झोपला अथवा बसला म्हणजे त्याच्यासोबत त्या जागेवर नेहमी बसणारा अथवा झोपणारा वाद घालतो. या वादातून कित्येकदा प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडतात. त्यातून एखादी अप्रिय घटना देखील घडते.

हुसेन आयुब शेख हा एक रिकामटेकडा तरुण होता. तो काहीही कामधंदा करत नव्हता. काही वर्षापुर्वी त्याने आई वडीलांचे घर सोडून दिले होते. जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, अजिंठा चौफुली परिसरात तो भटकत असे. भिक्षा मागून तो त्याचे उदरभरण करत असे. फिरस्ता असलेल्या हुसेन शेख हा तरुण पुर्वी त्याच्या आई-वडील व भाऊ बहिणीसोबत जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील बॉंबे बेकरी जवळ रहात होता. त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. बालपणापासून तो त्याच्या वडीलांसोबत ट्रान्सपोर्टच्या ट्रकवर क्लिनरचे काम करण्यास जात असे. त्यामुळे तो शाळेत कधी गेलाच नाही. त्याच्या निष्काळजी वडीलांनी त्याचे आधार कार्ड अथवा कोणतेही कागदपत्र तयार केले नाही. ट्रक ड्रायव्हर असलेल्या वडीलांसोबत वावरतांना हुसेन यास मद्यपान करण्याचे व्यसन जडले. मद्यपानासह सोल्युशन प्राशन करणे, गांजा पिणे अशा प्रकारचे व्यसन त्याला जडले. कोणताही कामधंदा न करणारा व्यसनी हुसेन एकप्रकारे या धरणीला भार होता. घर आणि परिसरातील पोषक नसलेले वातावरण देखील त्याला कारणीभुत होते.

दिवसेंदिवस हुसेन मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेला होता. मद्यपानाचे व्यसन पुर्ण करण्यास तो वडील आयुब शेख यांच्याकडे पैशांची मागणी करत असे. व्यसनासाठी पैसे मिळाले नाही म्हणजे तो घरात वाद घालत असे. प्रसंगी घरातील वस्तूंची तोडफोड करत असे. त्यामुळे त्याने घर सोडून द्यावे असे त्याला सांगण्यात आले. संतापाच्या भरात एके दिवशी त्याने घर सोडून दिले. तेव्हापासून तो एकटाच भिक्षा मागून फिरस्ता बनून भटकू लागला. भिक्षा मागून मिळालेल्या पैशातून तो त्याचे व्यसन पुर्ण करु लागला.

हव्या त्या प्रमाणात भिक्षा मिळत नसल्यामुळे त्याने कचरा संकलन करण्याचे काम सुरु केले. या कामातून मिळणारे पैसे तो व्यसन पुर्ण करण्यास खर्च करु लागला. जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील गॅरेज रात्री बंद होण्याची तो वाट बघत असे. या परिसरातील गॅरेज रात्री बंद झाले म्हणजे त्याच्या बाहेर तो झोपी जात असे. दिवस उजाडला म्हणजे गॅरेज उघडण्यापुर्वी तो भंगार जमा करण्यास निघून जात असे.
दिनांक 9 जानेवारीचा दिवस उजाडला. या दिवशी तो नेहमीप्रमाणे अजिंठा चौफुली परिसरात रस्त्यावरील भंगार जमा करत होता. त्यावेळी परिसरातील बाबा बॅटरी या दुकानासमोर त्याला एक अनोळखी इसम झोपलेला दिसला. आपल्या इलाक्यात अनोळखी इसम कसा काय आला आणि कसा काय झोपला हे बघून हुसेन चिडला. हा परिसर जणूकाही आपल्याच मालकीचा आहे अशा अविर्भावात हुसेन याने त्या अनोळखी इसमाला झोपेतून उठवले. तु इथे का झोपला असा हुसेन याने त्याला जाब विचारण्यास सुरूवात केली.

आपल्याला झोपेतून उठवून खालच्या पातळीवरील भाषेत बोलणा-या हुसेनचा त्या अनोळखी इसमाला राग आला. त्याने देखील हुसेनला त्याच पद्धतीने शिवीगाळ सुरु केली. दोघांमधे शाब्दिक वाद सुरु झाला. शब्दामागे शब्द वाढत गेला. हुसेन यास प्रचंड राग आला. संतापाच्या भरात हुसेन याने त्या अनोळखी इसमास मारहाण करत त्याचा दोन्ही हातांनी गळा दाबण्यास सुरुवात केली. खिशात असलेल्या रुमालाने त्याने त्या अनोळखी इसमाचा गळा आवळण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच हुसेन न थांबता त्याने त्या अनोळखीच्या छातीवर बसून उड्या मारण्यास सुरुवात केली. या घटनाक्रमात त्या अनोळखी इसमाचा जीव गुदमरला आणि त्याने आपले प्राण सोडले. त्याची हालचाल बंद झाल्याचे लक्षात येताच हुसेन याने तेथून पलायन केले.


त्यानंतर हळूहळू परिसरातील दुकाने उघडण्यास सुरुवात झाली. परिसरातील बाबा बॅटरी या दुकानाबाहेर अनोळखी बेवारस इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती परिसरात पसरली. मयत बेवारस इसम कोण आहे हे बघण्यासाठी आजुबाजूचे लोक जमा होण्यास सुरुवात झाली. बघता बघता गर्दी वाढू लागली. दरम्यान मयत बेवारस इसम हा काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरातील एका हॉटेलवर वेटरचे काम करणारा भाऊसाहेब अभिमन पवार असल्याचे काही जणांच्या लक्षात आले.


संबंधीत हॉटेल मालकाने पाहणी केली असता मयत इसम हा आपल्याच हॉटेलवर काम करणारा वेटर असल्याचे ओळखले. त्या हॉटेल मालकाने लागलीच मयत भाऊसाहेब पवार याच्या एका नातेवाईक तरुणाला फोनद्वारे माहिती दिली. त्या तरुणाने त्याचे राज्य परिवहन मंडळात वाहक पदावर कार्यरत असलेल्या त्याच्या वडीलांना फोन लावून याबाबत माहिती दिली. त्यामुळे प्रकाश भास्कर पाटील हे त्यांच्या मुलासह घटनास्थळी आले. मयत भाऊसाहेब अभिमन पवार हे प्रकाश पाटील यांचे मेहुणे होते. मृतदेह बघून प्रकाश पाटील यांनी लागलीच पोलिसांना सांगितले की हे माझे मेहुणे भाऊसाहेब अभिमन पवार आहेत. अशा प्रकारे मृतदेहाची ओळख पटली.

मयत भाऊसाहेब पवार यांचे इतर नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत भाऊसाहेब पवार यांच्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. मयत भाऊसाहेब यांचा गळा आवळल्याचे व्रण नातेवाईकांना दिसून आले. त्यामुळे त्यांचा घातपात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणीकामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. गळा दाबून भाऊसाहेब यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले.


मयत भाऊसाहेब पवार यांच्या मृत्युप्रकरणी प्रकाश भास्कर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.नं. 31/2026 नुसार अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. या खूनाच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे समांतर तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. या पाहणीत पोलिस पथकाला संशयीत मारेकरी हा मयत भाऊसाहेब पवार यांचा गळा आवळून त्यांच्या अंगावर उडी मारतांना दिसून आला. पोलिस पथकाने भाऊसाहेब पवार यांच्या मारेक-याची ओळख पटवली असता त्याचे नाव हुसेन शेख आयुब शेख असल्याचे निष्पन्न केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उप निरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील व राहुल कोळी यांचे पथक संशयीताच्या शोधार्थ तयार केले. त्यांनी पथकाला मारेकरी हुसेन शेख याच्या मागावर रवाना केले. दिवसभर रेल्वे स्टेशन, बस स्थानक व नशिराबाद आदी ठिकाणी शोध घेतल्यानंतर सायंकाळी हुसेन शेख याच्या मुसक्या आवळण्यात पोलिस पथकाला यश आले. ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सापळा रचून हुसेन शेख यास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासकामी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.


जन्म आणि मृत्यु या दोन गोष्टी निसर्गाने आपल्या हाती ठेवल्या आहेत. एखाद्याचा मृत्यु कधी आणि कसा होईल हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. कुणाचा मृत्यु कधी आणि कसा होणार आहे हे केवळ नियतीला अर्थात निसर्गालाच माहिती असते. रोजगाराच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथून जळगाव शहरात आलेल्या भाऊसाहेब पवार यांचा भटक्या हुसेन शेख या व्यसनी तरुणाच्या हातून खून झाला.
मयत भाऊसाहेब अभिमन पवार हे मुळचे अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी होते. त्यांची पत्नी गेल्या सहा वर्षापुर्वी मयत झाली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरी निमीत्त स्थायिक झाला होता. त्यामुळे एकटेच असलेले भाऊसाहेब पवार हे जळगाव येथे कामधंद्यानिमीत्त आले होते. त्यांना जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरातील एका हॉटेलमधे वेटरचे काम मिळाले होते. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप अधिक्षक नितीन गणापुरे तसेच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ व त्यांचे सहकारी राहुल पाटील करत आहेत.









