जळगाव : लहान मुलांमधील जिज्ञासा, सर्जनशीलता आणि नवोपक्रमशील विचारांची जोपासना करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले अनुभूती संडे स्कूलचे उद्घाटन नुकतेच झाले. २.५ ते ७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खुले असलेले हे संडे स्कूल अनुभवाधारित शिक्षणावर भर देते.
उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी पक्षी ओळख उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. आरोग्य व स्वच्छता या विषयावर डॉ. समीर पवार यांनी मार्गदर्शन केले. योग्य पद्धतीने हात धुणे, दात घासणे, शरीर स्वच्छ ठेवणे आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व त्यांनी गोष्टी व संवादाच्या माध्यमातून समजावून सांगितले.
अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रयोगांनी मुलांना मंत्रमुग्ध केले. सायन्स मॅजिक, डान्सिंग रोबोट आणि मजेदार वैज्ञानिक संकल्पनांमुळे मुलांना विज्ञानाची गोडी लागली. लव रवी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स लॅबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विविध प्रकारचे रोबोट्स, उडणारी एअरक्राफ्ट मॉडेल्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
या प्रसंगी चेअरमन अतुल जैन, डायरेक्टर निशा जैन आणि अंबिका जैन यांनी शिक्षकवृंद व पालकांचे मनोबल वाढवताना सांगितले की, शाळेचे पोषक व सकारात्मक वातावरण लहान मुलांच्या कोवळ्या बुद्धीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.प्राचार्य मनोज परमार, मॉन्टेसरी समन्वयक कीर्ती पगारिया तसेच शिक्षिका वर्षा मोहिते, सोनिया शर्मा आणि स्मिता काटकर यांनी पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक अनोखी, आनंददायी आणि अनुभवसमृद्ध दुनिया अनुभवायला दिली.





