जळगाव : जळगाव पोलिस दलातर्फे अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई राबवण्यात आली. आज पहाटे पाच वाजेपासून जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन हद्दीत एकाचवेळी राबवण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईत नव्वदपेक्षा अधिक वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कार्यवाहीचे नेतृत्व केले. या मोहिमेमध्ये जळगाव उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांभोरी, टाकरखेडे, खेडी व लगतच्या परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करून ती ताब्यात घेण्यात आली आहेत.
जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत 32 ट्रॅक्टर आणि 8 डंपर अशा एकुण चाळीस वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली. कासोदा पोलिस स्टेशन हद्दीत एकुण पंधरा ट्रॅक्टर विरुद्ध कारवाई करुन ती जमा करण्यात आली आहेत. भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत एक ट्रॅक्टर आणि एक डंपर, एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत चार ट्रॅक्टर आणि एक डंपर अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत. मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत 15 ट्रॅक्टरशिवाय एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिस पथकाने जप्त केले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमा करण्यात आलेल्या संशयास्पद वाहनांच्या कागदपत्रांची तसेच चालकाच्या परवान्याची सखोल तपासणी करण्यात आली. ज्या वाहनांची व वाहन चालकाची कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नव्हती अथवा ज्या वाहनचालकांनी परवाना अटीचे उल्लंघन केले त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.






