धुळे – धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यालय अधीक्षक पंकज विक्रम पाटील यांना त्यांनी घेतलेल्या दहा हजार रुपयांच्या लाच प्रकरणी तीन वर्ष सक्तमजुरीसह दहा हजार रुपयांची दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली आहे. धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून याबाबत खळबळ माजली आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.
या लाच प्रकरणातील तक्रारदार यांनी ग्रामपंचायत अंगणवाडीचे काम वेळेवर पुर्ण केले नव्हते. त्यामुळे त्यांना शिंदखेडा बांधकाम उप विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी पंकज विक्रम पाटील यांच्याकडे कार्यालय अधीक्षक पदाचा कारभार होता. तक्रारदार ठेकेदाराविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही टाळण्यासह प्रकरण मिटवण्यासाठी पंकज पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत ती स्विकारली होती. धुळे शहर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी पुर्ण करत धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्या. एस. एम. तापकीरे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. धुळे घटकाचे प्रभारी अधिकारी सचिन साळुंखे यांच्यासह कोर्ट पैरवी अंमलदार प्रविण पाटील, सागर शिर्के यांनी कामकाज केले. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता देवेंद्र तवर व अजय सानप यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले.



