जळगाव – जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरील समर्थ लॉननजीक रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता एका बाजूने बसला असून मधोमध तब्बल ४ ते ६ इंचांची धोकादायक भेग पडली आहे. या भेगेत दुचाकीचे चाक अडकल्याने वाहनचालकांचा तोल जात असून गंभीर अपघातांना आमंत्रण मिळत आहे. दिनांक १ मे २०२६ रोजी रात्री अशाच एका अपघातात वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही अत्यंत वेदनादायक व संतापजनक बाब आहे.

आज सकाळी सात वाजेपासून संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. नगरसेवक विजय बांदल यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार प्रशिक्षक दीपककुमार पी. गुप्ता यांच्याशी संपर्क साधून पाठपुराव्यासाठी मदत मागितली. घटनास्थळी पोहोचताच दीपककुमार गुप्ता यांनी तात्काळ आमदार सुरेश दामू भोळे यांना दूरध्वनी करून जागेवर येण्याची विनंती केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी येणे भाग पडले.
आमदारांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सोमवार, दिनांक ४ मे २०२६ रोजी संबंधित ठेकेदार बी. एन. अग्रवाल, अभियंते, आमदार व नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. तात्पुरत्या उपाययोजनेअंतर्गत आजच्या आज रस्त्यातील धोकादायक फट डांबराने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याच्या मधोमध बसवूनच चर्चा करण्यात आली, यावरून परिस्थितीची तीव्रता स्पष्ट झाली.
दीपककुमार पी. गुप्ता यांनी पुढील ठाम मागण्या केल्या आहेत — संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. संपूर्ण रस्त्याचे तांत्रिक ऑडिट करण्यात यावे. नुकसान झालेला भाग पूर्णपणे नव्याने व दर्जेदार पद्धतीने तयार करण्यात यावा. सततच्या पाठपुराव्यानंतर आज दुपारी संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरते काम सुरू केले. यावेळी दीपककुमार गुप्ता यांनी स्वतः घटनास्थळी उभे राहून काम करून घेतले.





