नवी दिल्ली : बिहार विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने यापुर्वी फेटाळली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहार विधानसभेची निवडणूक वेळेवर घेतली जाणार असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने दुपारी साडे बारा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी निवडणूकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्षासह काही राजकीय पक्षांकडून ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतांना रस्सीखेच होणार आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू हा बिहारमधे मोठा पक्ष आहे. अशा वेळी 243 जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजपाकडे खेचतांना फडणवीसांसह बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची कसोटी आहे. फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र फडणविसांवर केवळ बिहार निवडणूकीपुरता जबाबदारी असल्याचे देखील म्हटले जात आहे.