सातारा : देवाने प्रत्येक व्यक्तीला बुद्धी दिली आहे. प्रत्येकाला मेरिटनुसार आरक्षण देवून सगळेच आरक्षण रद्द करावे. ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळतो. ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून त्याला प्रवेश मिळत नाही. त्याचे मानसिक खच्चीकरण होते व नैराश्य येते. काहीजण आत्महत्या करतात अशी खंत खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडले असा आरोप केला जात आहे. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले. अशातच ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला. त्यावर देखील मराठा समाजाने नाराजी जाहीर केली आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक असताना खा. उदयनराजे भोसले यांनी एक मोठे विधान केले आहे. समाजातील सर्व घटकांचे आरक्षण रद्द करा व मेरिटनुसार आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत उदयनराजे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळून देखील त्यांना प्रवेश मिळत नाही. दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतो. प्रत्येकाला देवाने बुद्धी दिली आहे. मेरिटनुसार आरक्षण द्यावे. सगळेच आरक्षण रद्द करावे. ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणाच्या नावाखाली प्रवेश मिळतो. ज्याने कष्ट घेतले मात्र आरक्षण नाही म्हणून त्याला प्रवेश मिळत नाही. त्याचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते व नैराश्य येते. काही जण आत्महत्या करुन आपले जीवन संपवतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.