रायगड किल्ला केंद्र सरकारकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ

मुंबई : रायगड किल्ला केंद्र सरकारकडून राज्याच्या ताब्यात घेऊन तो शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा तो पुन्हा तयार करण्याची संकल्पना छगन भुजबळ यांनी मांडली. नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी केवळ देवदर्शन करुन परत न जाता काही दिवस मुक्कामी रहावे. यासाठी परिसरातील विविध पर्यटनस्थळांचा विकास केला जात असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण परिसरातील ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लब यासह खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. राज्यातील पर्यटनस्थळे, तिर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्वाचे हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची सविस्तर माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे यावेळी प्रकाशन देखील करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी रायगड किल्ला केंद्र सरकारकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो तयार करण्याची संकल्पना मांडली.

नाशिक परिसरातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगीगड या पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढवली आहे. आज सुरु करण्यात आलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट व बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here