नोव्हेंबर पर्यंत संपुर्ण राज्य होणार अनलॉक – राजेश टोपे यांचे संकेत

अहमदनगर : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी २६ हजार ४४० रुग्ण चांगले होवून घरी गेले आहेत. आतापावेतो १२ लाख ५५ हजार ७७९ एवढे रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसुन येत आहे. आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्य अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील जवळपास चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल व बार पुन्हा उघडले आहेत. त्यामुळे राज्यात आता टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडतील. नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य अनलॉक होईल, अशी अपेक्षा करुया असे वक्तव्य राजेश टोपे यांनी अज अहमदनगर येथे केले. कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी टोपे आज अहमदनगर येथे आले होते.

राजेश टोपे यांच्या या वक्तव्यामुळे लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात रेल्वे सुरु करण्यात आली असून लवकरचं सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने देखील प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालय सुरु करण्याचा विचार राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्क्यांवर गेले आहे. राज्यात २ लाख २१ हजार १५६ सक्रिय रुग्णांवर उपचार यावेळी सुरु आहे. राज्यात शनिवारच्या दिवशी ११ हजार ४१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३०८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १५ लाख १७ हजार ४३४ एवढा टप्पा गाठला आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ४० हजार ४० एवढी गेली आहे.

सध्या राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ व्यक्ती घरच्या घरी विलगीकरणात आहेत. तसेच २४ हजार ९९४ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here