अमरावती : काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या नेत्या व महाविकास आघाडी सरकारमधील महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा अमरावती जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे. आठ वर्षांपूर्वीच्या एका खटल्याप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
आठ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी अमरावती येथील अंबादेवी मंदिरानजीक यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादाच्या वेळी यशोमती ठाकुर यांनी पोलिसांसोबत हुज्जतबाजी केली होती.
पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाणीचा प्रयत्न करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे.
यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाले. त्यामुळे अमरावती न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा तसेच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.